निरंकारी सद्गुरु माताजींच्या शुभहस्ते 75व्या वार्षिक संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ

मुंबईसह महाराष्ट्रातूनही सेवेसाठी जाणार अनेक भक्तगण

 १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत होणाऱ्या ७५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारम्भ निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे करण्यात आला.  या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे  सदस्य, केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य, सेवादलचे अधिकारी, स्वयंसेवक तसेच दिल्ली व आजुबाजुच्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने आलेले भाविक भक्तगण सहभागी झाले होते. 

सद्गुरु माताजींचे समागम स्थळावर आगमन होताच आदरणीय श्री.सुखदेवसिंह (समन्वय समिति कमिटी अध्यक्ष) व आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजा (सचिव संत निरंकारी मण्डल) यांनी त्यांचे हार्दिक अभिनन्दन केले.
संत समागम सेवांच्या या शुभारंभाच्या प्रसंगी समस्त निरंकारी जगत तसेच प्रभु प्रेमी सज्जनांना संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की सेवेची भावना समर्पणाने युक्त असायला हवी. सेवा ही आदेशानुसार व मनोभावे पूर्णतः समर्पित होऊन केली जाते आणि तेव्हाच ती सार्थक ठरते. सेवा हे केवळ एक काम किंवा कार्य नसून त्यामध्ये जेव्हा सेवेचा यथार्थ भाव सामावला जातो तेव्हा अशा सेवेचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. सेवा नेहमी जागरुकपणे करायला हवी. आमचे कर्म अथवा व्यवहार यामुळे कोणाचाही निरादर किंवा तिरस्कार होणार नाही हे ध्यानात ठेवले पाहिजे. सर्व संतांचा आदर करावा. कारण प्रत्येकामध्ये हा निराकार निवास करत आहे. अशा भक्तीभावाने युक्त होऊन सेवा करावी आणि मनामध्ये ईश्वराचे स्मरण करत आपल्या सेवांचे योगदान देत जावे. 
निरंकारी संत समागमांची ही श्रृंखला अविरतपणे मागील ७४ वर्षांपासून यशस्वीपणे चालत आलेली असून ७५व्या भव्य वार्षिक संत समागमाची प्रतीक्षा प्रत्येक भक्त मोठ्या आतुरतेने करत आहे. सद्गुरु माताजींच्या पावन अध्यक्षतेखाली आयोजित होणाऱ्या या दिव्य समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जन सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्यांची उचित व्यवस्था व्हावी यादृष्टीने समागम स्थळावर दररोज हजारो भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक आपल्या सेवा अर्पण करत राहतील. 
संत समागमाच्या सेवांमध्ये भाग घेण्यासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल आणि भाविक भक्तगण टप्प्या-टप्प्याने व तुकड्या तुकड्यांनी समागम सेवेमध्ये भाग घेणार असून त्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील हजारो स्वयंसेवकांचा समावेश आहे. 
७५व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये सहभागी होणाऱ्या समस्त भाविक-भक्तगणांना अधिकाधिक चांगल्या सुख-सुविधा प्रदान करण्याच्या हेतुने समागम स्थळावर शामियान्यांची एक सुंदर नगरी उभारण्यात येत असून त्यामध्ये भक्तांच्या निवासाची, चहापान व इतर मुलभूत सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधांची व्यवस्था प्रशासन व अधिकाऱ्यांच्या सहयोगाने केली जाणार आहे. याशिवाय समागम स्थळावर विविध विभागांची कार्यालये, प्रकाशन स्टॉल, प्रदर्शनी, लंगर, कँन्टीन व डिस्पेन्सरी इत्यादि सुविधा उचित प्रमाणात उपलब्ध करण्यात येतील. 
वाहतूक व्यवस्थे अंतर्गत यावर्षीही रेलवे स्टेशन, बस स्थानके तसेच विमानतळावरुन समागम स्थळावर येणाऱ्या भक्तगणांसाठी येण्याजाण्याची उचित व्यवस्था केली जात आहे. याशिवाय अन्य वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था समागम स्थळावर केली जाणार आहे.  
अनेकतेत एकता एकतेचा अनुपम दृश्य प्रदर्शित करणारा हा दिव्य संत समागम दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी प्रेरणादायी व आनंददायक होईल, अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments