युथ फॉर जत व येरळा प्रोजेक्ट तर्फे ७५ विद्यार्थिनींना होणार सायकलींचे वाटपजत/प्रतिनिधी:- जत तालुका हा पर्जन्य छायेत येणारा तालुका आहे. त्यामुळे दुष्काळ प्रवण होय. सर्व साधारणपणे या भागातील प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा आहेत. परंतु इयत्ता ७ वी पुढील शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना इतर गावातील माध्यमिक शाळेत जावे लागते. यातील अनेक गावात शाळेच्या वेळेत दळणवळणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज ४ ते ५ कि.मी. चालत जावे लागते. मुलींच्या सुरक्षिततेच्या तसेच त्यांच्या शाळेतील प्रगतीच्या दृष्टीने हे मुलींच्या पालकांची काळजी वाढवणारे आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबातील मुलींची शाळा सोडविली जाते. या वर्षी अशा गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून नवीन लेडीज सायकली देण्याचे नियोजन सांगली स्थित येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी आणि युथ फॉर जत या संस्थांनी मिळून केले आहे. 
         १५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य राखून येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी, सांगली आणि युथ फॉर जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत भागातील गरीब कुटुंबातील ७५ मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून सायकल वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी जत तालुक्याच्या दुर्गम खेड्यांतून अर्ज मागवण्यात आले. येरळा व युथ फॉर जत च्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक अर्जदारांच्या घरी भेट देवून त्यांच्या परिस्थितीचे अवलोकन करून लाभार्थ्यांची निवड केली आहे.
        आपला देश आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रगती करतो आहे. जत तालुक्याच्या दुर्गम खेड्यात रहाणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा, देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी व युथ फॉर जत या ग्रामविकासाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा हा सांकेतिक उपक्रम आहे. 
       सायकल वितरणाचा कार्यक्रम जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालय या ठिकाणी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.३० ला होणार आहे. हा सायकल वितरण सोहळा इंग्लंड मध्ये कार्यरत असलेल्या नामवंत वकील शुभांगी शिवपूजे मित्रा यांच्या शुभहस्ते व येरळाचे सचिव  ना.व. देशपांडे, युथ फॉर जत चे अध्यक्ष दिनेश शिंदे, सचिव अमित बामणे, डॉ. कैलास सनमडीकर, मा. प्रमोद पोतनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Post a Comment

0 Comments