चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून!जत/प्रतिनिधी:- जालिहाळ बुद्रुक ता.जत येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात बेडग्याने वार करून तिला संपविलेची घटना समोर आली आहे. केसराबाई बाळकृष्ण सावंत (वय ५०) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.२४ रोजी) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
         या बाबत पोलिसांनी दिलेळी माहितीनुसार, जालिहाळ बुद्रुक येथे बाळकृष्ण संदिपान सावंत यांचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी कर्नाटक येथील वळसंगी (ता.विजयपूर) येथील केसराबाई हिच्याशी झाला होता. संदिपान व केसराबाई यांना तीन मुली आहेत. दरम्यान, गेल्या चार महिन्यापूर्वी केसराबाई व संशयित आरोपी बाळकृष्ण सावंत यांच्यात भांडणे होत होती. संशयित आरोपी बाळकृष्ण हा पत्नी केसरबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. याच कारणावरून चार महिन्यापूर्वी केसराबाई तिच्या माहेरी गेली होती.एक महिन्यापूर्वी बाळकृष्णने माहेरी जाऊन समजूत काढून केसराबाई हिला घेऊन आला होता. अधूनमधून त्यांची सतत भांडणे होत होती.याबाबतची कल्पना तिने तिच्या भावाला दिली होती.
          पती-पत्नीत राहत्या घरात मंगळवारी सकाळी कडाक्याचे भांडण झाले.यात पतीने शिव्या देत बेडग्याने केसराबाईच्या डोक्यात वार केला.वार वर्मी बसल्याने केसराबाईचा जागीच मृत्यू झाला.याबाबतची फिर्याद कृष्णा हंबीर पवार (रा. वळसंगी, ता. विजयपुर) यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली. संशयित आरोपी पती बाळकृष्ण संदीपान सावंत यास उमदी पोलिसांनी अटक केली. उमदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार अधिक तपास तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments