कवींनी सामजिक जबाबदारी जपली पाहिजे: लवकुमार मुळे

बनाळीमध्ये राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने कवि संमेलन संपन्न


जत/प्रतिनिधी: साहित्य हा समाजाचा आरसा आहे. एक समाजशील घटक म्हणून कवी हा समाजातील आरसा कवितेच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. साहित्याबरोबरच कवीने सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन लवकुमार मुळे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे बनाळी, ता. जत तेथील विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये कवी संमेलनाध्यक्ष म्हणुन आपल्या भावना व्यक्त करताना व्यक्त केले. याप्रसंगी रावसाहेब यादव, रशीद मुलाणी, रवी सांगोलकर, रावसाहेब साठे, अनिता सावंत, उज्वला कांबळे व सरपंच विद्या सावंत उपस्थित होत्या.
             कवी संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष लवकुमार मुळे यांनी वेदनांचे थवे, मेघराज, गाव दुष्काळी माथ्याचे या कविता सादर केल्या. तर रशीद मुलाणी यांनी पुलमावा ही कविता सादर केली. रावसाहेब यादव यांनी सांभाळ, सांभाळ, सांभाळ मामा तुझ्या पोरीला व मनातील गोष्ट या कविता सादर केल्या. महाविद्यालयाची विद्यार्थिनी व युवा कवयत्री उज्वला कांबळे हिने वडिलांचं नातं व सैनिकाचे जीवन या कवितेच्या माध्यमातून उपस्थित स्वयंसेवक व स्वयंसेविका यांना प्रोत्साहित केले. रवि संगोलकर, रावसाहेब साठे, अनिता सावंत यांनीही या कवी संमेलनामध्ये भाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या.
            या कवी संमेलनामध्ये कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय जाधव, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके, बनाळी गावच्या सरपंच विद्या सावंत, अनिता सावंत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुप्रिया गायकवाड, सूत्रसंचालन अपर्णा आरळी तर आभार वैष्णवी मोरे हिने व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments