छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे नाहरकत दाखल्यांची पुर्तता अंतीम टप्प्यात; जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे व माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांची माहिती


जत/प्रतिनिधी:- जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे नाहरकत दाखल्यांची पुर्तता अंतीम टप्प्यात, लवकरच महाराजांची अश्वारूढ पुर्णाकृती मूर्ती नियोजीत ठिकाणी बसविण्यात येणार असल्याची माहिती . जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश जमदाडे व माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांची दिली. 
         जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविण्यात येणा-या पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती प्रतिष्ठापना संदर्भात सांगली चे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यानी नियमावर बोट ठेवल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती जत शहरात आणण्यात येऊनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी बसविण्यात न आल्याने समस्त शिवप्रेमी नाराज झाले होते. त्यातच जत शहरासह तालुक्यातील परिस्थिती चांगल्या प्रकारे असतानाही जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपूर्वीच जत शहरात जमावबंदीचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे तर पोलीस प्रशासनाने काहीही दंगा,धोपा, तणाव नसताना  जत शहरात दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या व दिडहजार पोलीसांना बंदोबस्तासाठी बोलावले होते. त्यामुळे जत तालुक्याची सर्वत्र मोठी बदनामी झाली होती. 
          जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती ज्या ठिकाणी बसविण्यात येणार होती त्या जागेवर यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती होती. परंतु एका चारचाकी वाहनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती सभोवताली असलेल्या चबुत-याला रात्रीच्या वेळी जोरदार धडक दिल्याने या ठिकाणी असलेल्या चबुत-याचे मोठे नुकसान होऊन छत्रपतींच्या मूर्तीस अंशतः नुकसान पोहचले होते. त्यामुळे आहे त्या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसविण्यासाठी म्हणून जत नगरपरिषदेने लाखो रूपये खर्च करून आर.सी.सी. मध्ये भक्कम अशा चबुत-याचे कामही पूर्ण केले होते. परंतु छत्रपतींच्या मूर्ती बसविण्यावरून राजकारण करणा-या काही लोकांच्या विरोधामुळे आहे त्या ठिकाणी छत्रपतींची मूर्ती बसविण्यासाठी परवानगीची गरज नसताना प्रशासनाने आमच्या मागणे परवानग्यांचे काम लावले. 
           माजी आमदार व छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यानी परवानग्या घेऊनच छत्रपतींची मूर्ती बसवू असा निर्धार केल्याने व जिल्हयाचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री ना जयंतरावजी पाटील यानीही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ची प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात जे काही दाखले लागतील ते जिल्हास्तरावर समितीला उपलब्ध करून देण्याचे आदेश बैठकित दिल्याने व त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत एकतीस नाहरकत दाखल्यांची पुर्तता केली असून अजून दोन दाखल्यांची पुर्तता होऊन तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जत येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या चबुत-यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसणार आहे असेही जमदाडे आणी सावंत यांनी सांगितले. 
          छत्रपती शिवाजी महाराज यांची पुर्णाकृती अश्वारूढ मूर्ती बसविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर लवकरच आम्ही एक सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचेही जमदाडे आणी सावंत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments