म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून निधी द्यावा

प्रकाश जमदाडे यांनी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांना दिले निवेदन


जत/प्रतिनिधी :- म्हैसाळ विस्तारित योजना जतसाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून निधी उपलब्ध करून देणेत यावा, अशी मागणी सांगली " जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
          निवेदनात म्हटले आहे की, जत तालुका हा कायम दुष्काळी असून पिण्याच्या पाण्यासाठी ५० किलोमीटर अंतरावरून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. म्हैसाळ योजनेतून पश्चिम उत्तर व काही दक्षिण भागात जवळपास ५० गावात पाणी आले आहे. खासदार संजय पाटील व तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून आपण २०१८ मध्ये प्रधानमंत्री सिंचन योजनेतून निधी दिल्याने योजना पूर्ण होण्यासाठी मोठी मदत झाली आहे. मात्र अजूनही जत तालुक्यातील पूर्णत: ४८ गावे व अशत: १७ गावे सिंचनापासून वंचित आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाचे माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. विस्तारित म्हैसाळ योजना जत भाग म्हणून सर्व्हे पूर्ण झाला असून डिझाईन व अंदाजपत्रक करणे प्रगतिपथावर आहे.
          साधारणपणे या योजनेस १००० ते १२०० कोटी रुपये खर्च होणार आहे. तसेच जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन या भागातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. तरी सदर योजनेसाठी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती जमदाडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments