पोलीस असल्याचे सांगून वृध्द महिलेला लुटले; १ लाख ६२ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने केला लंपासजत/प्रतिनिधी: जत शहरातील शिवानुभव मठाजवळ पोलीस असल्याची बतावणी करून येथील ८५ वर्षीय वृध्द महिलेच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या व चेन असे एकूण १ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात तीन जणांनी लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
          जत येथील कापड व्यापारी शांतीलाल व भिमराज ओसवाल यांच्या आई सूरजदेवी मिश्रीमल ओसवाल या सकाळी गांधी चौकातील मारुती मंदिरात पाया पडून जैन मंदिरात पूजा करण्यासाठी जात असताना एका इसमाने तुम्हाला पोलिसांनी बोलाविले असे म्हणून पुढे उभारलेल्या दोघांकडे हात दाखविला. वृध्दा त्यांच्या जवळ गेली असता त्या दोघांनी आम्ही साध्या वेशातील पोलिस आहोत. चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने आम्ही नजर ठेऊन आहोत. तुम्हीही तुमच्या बांगड्या काढून पिशवीत ठेवा, असे सांगून बांगड्या व चेन पिशवीत भरल्याचे दाखविले. मात्र थोड्या वेळाने या वृध्देने दागिने बघितले असता त्यात बनावट बांगड्या घातल्याचे निदर्शनास आले. घडलेला प्रकार त्यांनी तात्काळ आपल्या मुलांना सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत सूरजदेवी यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहा तोळ्याच्या चार सोन्याच्या बांगड्या किंमत १ लाख ५० हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची चेन किंमत १२ हजार ५०० असा एकूण १ लाख ६२हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments