डिजीटली साक्षर होणे काळाची गरज- अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख सांगली : आधुनिक युगात चलन देवाणघेवाण करून व्यवहार पूर्ण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून संगणकाव्दारे, स्मार्ट फोनव्दारे ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात आभासी चलनही उदयास येत असून याचा वापर सजगपणे करणे त्याचबरोबर डिजीटली साक्षर होणे ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, सांगली अर्बन बँकेच्या आयटी सेलचे प्रमुख जयदीप दळवी उपस्थित होते.
          बुध्दीमत्तेचा वापर करून अनेक लोक ऑनलाईन पेमेंट करताना लोकांना फसवून लूट करतात. स्वत:ची फसवणूक व लूट थांबविण्यासाठी प्रत्येकाने ऑनलाईन किंवा कोणतेही व्यवहार करताना ते सजगतेपणे केले पाहिजेत, असे सांगून अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, डिजीटल पेमेंट करताना आपली गोपनीय माहिती जसे की आपल्या बँकेचा अकॉऊंट नंबर, ओटीपी, पिन कोड, सीव्हीव्ही, क्रेडिट/डेबिट कार्डचा व्हीपीआय कोड कोणासही सांगू नये अथवा शेअर करू नये. ऑनलाईन पेमेंट करताना स्वत:ची पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत व्यवहार पूर्ण करू नयेत. ज्या ठिकाणी स्वत:ला शंका वाटत असतील अथवा काही समस्या निर्माण झाल्यास थेट बँकेशी संपर्क साधावा. यावर्षीचे ग्राहक दिनानिमित्तचे फेअर डिजीटल फायनान्स हे घोषवाक्य आहे. या घोषवाक्याचा सर्वांनीच समर्पकपणे विचार करून त्याप्रमाणे ऑनलाईन व्यवहार करावेत व स्वत:ची फसवणूक टाळावी आणि स्वत:चे संरक्षण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          प्रारंभी दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यशाळेत सांगली अर्बन बँकेच्या आयटी सेलचे प्रमुख जयदीप दळवी यांचे डिजीटल पेमेंट साक्षरता व ऑनलाईन फसवणूक कशी टाळावी या विषयावर सविस्तर व्याख्यान झाले.

Post a Comment

0 Comments