पत्रकार एन.बी. गडदे यांना मारहाण करणाऱ्यांची कळंबा जेलमध्ये रवानगी; जत न्यायालयाने दिली न्यायालयीन कोठडी


जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील बाज येथील तरुण भारतचे  पत्रकार नाना गडदे यांना मारहाण करणारे माजी सरपंच संजय आनंदा गडदे व त्याचे साथीदार अशोक बिरू गडदे , विकास बंडगर या तिघांना जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता त्यामुळे सर्व संशयित आरोपींची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये करण्यात आली आहे.
          यामुळे पत्रकारांना मारहाण करणार्‍यांना पत्रकार संरक्षण कायद्याचा जबरदस्त दणका बसला आहे. जतचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. सहाय्यक सरकारी वकील जे जे पाटील यांनीही संशयितांना जामीन मंजूर करू नये अशी मागणी केली. त्यानुसार जतचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. अ.भा. जाधव यांनी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 
          दरम्यान,आरोपींच्या वकिलाने जामीनासाठी  विनंती अर्ज केला आहे. सदर अर्जावर मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत तिघाही संशयितांची कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पत्रकारावर हात उचलणे व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणाऱ्यांना अनेक दिवस जेलची हवा खावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढे पत्रकारांवर हल्ले करण्याच्या प्रकाराला निश्चितच पायबंद बसणार आहेत.

Post a Comment

0 Comments