मोटारीची दुचाकीस धडक; अपघातानंतर सहा किलोमीटर फरफटत नेल्याने बालकाचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी; जत तालुक्यातील धावडवाडी येथील घटना



जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील धावडवाडी येथे मोटारसायकलने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोटारसायकलने मोटारीच्या बंपरवर अडकलेल्या बालकाला महामार्गावरून नागज पर्यंत तब्बल सहा किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अब्दुलसमद साजिद शेख असे मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजता घडला. याप्रकरणी मोटारचालक महादेव मधुकर कुंडले (वय 30 रा. जालिहाळ बु. ता. जत) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धावडवाडी येथील साजिद लालखान शेख व त्यांच्या पत्नी जनिब साजिद शेख हे मुलगा अब्दुलसमद याला घेऊन दुचाकीवरून (एम.एच.10- 3498) वरून मळ्याकडे निघाले होते. यावेळी मागून मोटारीने (एम.एच.12 एच.एन 1674) जांभुळवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात साजिद शेख जोराने उडून रस्त्यावर कोसळले, तर त्यांची पत्नी व मुलगा मोटारीच्या बंपर मध्ये अडकून तीनशे मीटर पर्यंत फरफटत गेले. तेथे जबिन याही रस्त्यावर पडल्या पण दोन वर्षाचा अब्दुलसमद मोटारीच्या बंपर मध्येच अडकून राहिला. तरीही चालकाने मोटार न थांबविता भरधाव वेगाने पलायन केले. पुढे महामार्गावरील चोरोची येथील बसस्थानकासमोर हा प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी त्यास खाण्याचा प्रयत्न केला. तरीही चालकाने मोटार भरधाव वेगाने पळविली. यामुळे नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान चालकाने रस्त्याकडेला मोटार थांबून बालकास बाजूला काढून टाकत मोटार पुढे पळवली. नागच फाट्यावर जमावाने त्याला रोखले व बेदम चोप दिला. त्यापाठोपाठ धावडवाडी येथील शेख यांचे नातेवाईक ही पोहोचले. त्यांनी अब्दुलसमदला ढालगाव येथील रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून अब्दुलसमदचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Post a Comment

0 Comments