जत तहसिलवर रामोशी समाजाचा मोर्चा | गुन्हे मागे न घेतल्यास २२ मार्चपासून आंदोलन; दौलत शितोळे


रामोशी बेरड समाजाने जत तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढला

जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील रामोशी बेरड समाजावर अन्याय केला जात आहे. मुंचडी येथील ढाबा पेटविल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घ्यावेत, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मालतेश मलमे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला परीक्षेचा पेपर देण्यास मज्जाव करणाऱ्या तपास अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी यासाठी जत तहसिल कार्यालयावर रामोशी समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढत प्रशासनाचा जाहीर केला.
           जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र व आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या मोर्चाचा प्रारंभ जत मार्केट कमेटीपासून झाला. महाराणा प्रताप चौक, आरळी कॉर्नर, संभाजी चौक, शिवाजी पेठ मार्गे तहसिल कार्यालयावर धडकला. मोर्चात जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष दौलत शितोळे, ज्येष्ठ नेते आनंदराव जाधव, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे, राज्य नेते अंगद जाधव, राजाभाऊ गुजले, जय मल्हार क्रांती संघटनचे  जिल्हाध्यक्ष पिनू मंडले, ब्रिगेड चे राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, रामोशी-बेरड सेवा समितीचे प्रकाश नाईक, युवा नेते रोहीत मलमे, मुंबई शाखेचे प्रतिनिधी संजय मंडले, पलूस नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल  दळवी, जत राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील, महिला प्रतिनिधी कल्पना मलमे, कोमल चव्हाण, मारुती शिरतोडे, हिम्मतराव मलमे, सुधीर नाईक, सुनिल दलवाई, संजय पाटोळे,सचिन जाधव यांच्यासह या मोर्चात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई आदी जिल्ह्यातून विविध कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता.
           तहसिल कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी जत तालुक्यात रामोशी समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल सर्वांनी जाहीर निषेध केला. मुंचडी ढाबा जळीत प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करून समाजाला बदनाम केले जात असल्याचा घणाघाती आरोप यावेळी समाजबांधवांनी केला. दाखल केलेल्या गुन्हा नोंदीतील रिमांड यादीमधील तारीख, वेळ, घटना यात खाडाखोड आणि विसंगती दिसत असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून गंभीर गुन्हे मागे घेण्याचे आदेश व्हावेत, ढाबा जळीत प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआय मार्फत करून  खऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. जतचे तहसिलदार जीवन बनसोडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दखल घ्या अन्यथा २२ मार्चपासून तीव्र आंदोलन; दौलत शितोळे - 
मुंचडी ढाबा पेटवणे प्रकरणी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा २२ मार्च पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष दौलत शितोळे यांनी यावेळी मोर्चा समोर बोलताना दिला.

 

Post a Comment

0 Comments