जत पोलीस वसाहतीची दुरावस्था; पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर "कोणी घर देता का घर" असे म्हणण्याची वेळ

जत/प्रतिनिधी:- जत पोलीस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने जीर्ण व मोडकळीस आल्याने गेली तीन-चार वर्षे ही निवासस्थाने कुलुपबंद आहेत. जत पोलीस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी अपार्टमेंटचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवूनही प्रशासन त्याची दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे जत पोलीस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणी घर देता का घर अशी वेळ आली आहे. 
          याबाबत सविस्तर माहिती अशी की, सज्जनांचे रक्षण करण्यास आणी दुर्जनावर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्द असणा-या जत पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांना गेली तीन चार वर्षे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जत पोलीस स्टेशनकडे एकूण ७० पोलीस कर्मचारी व पाच पोलीस अधिकारी कार्यरत असून निवासस्थाना अभावी हे सर्व कर्मचारी जत शहरात भाड्याने घरे घेऊन रहात आहेत. सद्या जत पोलीस लाईनमध्ये २७ पोलीस कर्मचारी निवासस्थाने असलीतरी ती जीर्ण व मोडकळीस आल्याने कुलुपबंद आहेत. 
          राज्यात पोलीस स्टेशनजवळच पोलीसांची निवासस्थाने आहेत. परंतू जत येथिल संस्थानकालिन पोलीस लाईन जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने या पोलीसलाईनमध्ये सद्या कोणीही अधिकारी व कर्मचारी रहात नाहीत. जत पोलीसलाईनची सद्याची अवस्था अत्यंत खराब व दयनीय अशी झाली आहे. या पोलीस वसाहतीमध्ये कोणी रहात नसल्याने निवासस्थाने कुलुपबंद आहेत. निवासात विषारी साप, घुशी व उंदरांचे वास्तव्य आहे. 
          जत नगरपरिषदेकडील जत सांगली मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेली नळपाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने या पाईपलाईनचे पाणी पोलीसलाईनमध्ये शिरले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचून चिखल साचला आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काटेरी झुडुपे उगवली आहेत. त्यामुळे या वसाहतीला विद्रुप स्वरूप आले आहे. जत पोलीस स्टेशनने सद्या असलेली व जीर्ण झालेली मोडकळीस आलेली पोलीस लाईन पाडून त्या ठिकाणी जत पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता अपार्टमेंटचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवूनही प्रशासन त्याची दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे जत पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांचे अपार्टमेंटमध्ये राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याबाबत सद्या तरी सांगता येत नाही. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथिल प्रशासकिय इमारतीच्या बांधकामासाठी बारा कोटी रूपयेचा निधि आणला आहे. तर जत येथिलच शासकिय पशुवैद्धकीय दवाखान्याजवळील जागेवर दिवाणी व फौजदारी न्यायालयासाठी ३१ कोटी ४९ लाख रूपयाचा निधि आणला आहे. 
          आमदार सावंत यानी जत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी भरिव प्रमाणात निधिची उपलब्धता करावी अशी अपेक्षा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments