जतमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरच बसविण्यात येणार; संजय कांबळे

प्रशासकीय मान्यतेस मंजुरी; समितितील पदाधिकाऱ्यांची माहिती


जत/ प्रतिनिधी :- जत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व प्रशासकिय बाबींची पूर्तता करून, नियोजीत स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
           यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले की, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सर्वे नंबर ७२३ या जागेवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे. नियोजित ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरच बसविण्यात येणार आहे. पुर्णाकृती पुतळा हा औरंगाबाद येथे तयार करण्यात आला असून लवकरच जतला आणणार आहोत.
           या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष ना. रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील , सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे असेही कांबळे म्हणाले.
           यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव नगरसेवक भूपेंद्र कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दि. ५ मार्च १९३४ रोजी जत येथे आले होते. त्यावेळी त्यानी जत येथे मोठी अस्पृष्यता निवारण परिषद घेतली होती. तेंव्हापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जत येथील समाजबांधवांना आठवण राहावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जतमध्ये बसविला जावा अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांची इच्छा होती. ती या निमित्ताने पूर्णत्वास जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबुत-यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यानी मोठी मदत केल्याचेही नगरसेवक भूपेंद्र कांबळे यानी सांगितले.
            यावेळी जत ग्रामपंचायतचे तत्कालीन माजी सरपंच ब.स.प.चे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे खजिनदार अतुल कांबळे म्हणाले की, पुतळा ज्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे त्या परिसरामध्ये भव्य असा बगिचा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुतळा परिसरासभोवती आकर्षक विद्युत रोषनाई व हायमस्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. सध्या स्मारकाच्या भोवताली दगडी भिंत बांधून त्यावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
            यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अशोकराव कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चबुत-यासाठी मदत केली आहे. चबुत-यावर फरशी बसवून सुशोभिकरण करण्याचे काम सुरू आहे.
           या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अशोकराव कांबळे, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव नगरसेवक भूपेंद्र कांबळे, खजिनदार अतुल कांबळे, पापा सनदी, संजय कांबळे (पाटील) नितीन , सनदी, वैभव कांबळे, पप्पू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments