मोठी स्वप्ने पहा; पोलीस निरीक्षक उदय डूबुल | लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावी व बारावी विद्यार्थी निरोप समारंभ उत्साहात साजराजत/प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत व त्यासाठी प्रचंड मेहनत व कष्ट घेऊन ती सत्यात उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डूबुल यांनी व्यक्त केले. ते लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थी निरोप समारंभाच्या  निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी उमा चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, स्कूलचे ऍडमिनिस्ट्रेटर डॉ. विद्याधर किट्टद, पर्यवेक्षक रामण्णा तंगडी व किरण पाटील उपस्थित होते.
          आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी म्हणाले की, शाळेचा निरोप घेत असताना आपले शिक्षक व शाळेला कधीही विसरू नये. शाळेतले अस्मरणीय क्षण आयुष्यभर जपून ठेवले पाहिजे. यावेळी कै. शांताबाई शिवशंकर आरळी आदर्श विद्यार्थी पुरस्काराचे सुद्धा वितरण झाले. यामध्ये अनुक्रमे अथर्व कुलकर्णी व नेहा बिराजदार यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
          या कार्यक्रमाला प्राचार्या विद्या सावंत, मुख्याध्यापिका गीता राठोड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मानसी साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता कोळी व रोहित कोळी यांनी तर क्षितिज सावंत यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments