पुतळा सार्वजनिक किंवा शासकीय जागेत स्थलांतरित करा; प्रांताधिकारी यांना निवेदन

 


जत/प्रतिनिधी:- जत शहरातील लोकवर्गणीतून तयार झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा सार्वजनिक किंवा शासकीय जागेत स्थलांतरित करण्यात यावा या मागणीचे निवेदन येथील प्रहार संघटना, शिवसेना, जत शहर व तालुका काँग्रेस, आरपीआय, युवा सेना, चर्मकार समाज तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना व जत शहरातील आजी व माजी नगरसेवक यांनी प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांना दिले.
           निवेदनात म्हटले आहे की, जत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा जत शहर व तालुक्यातील नागरिकांच्या लोकवर्गणीतून तयार करण्यात आला आहे. पुतळा बसवण्या संदर्भात बेकायदेशीररित्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती या नावाने माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली असून, सदर समिती ही नोंदणीकृत नाही. समितीने बेकायदेशीररित्या जमाव जमवून मिरज येथील मूर्तिकार सरगर यांचे गोडाऊन मधून, समितीतील इतर सदस्यांना विश्वासात न घेता. बळजबरीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा स्वतःच्या वैयक्तिक मालकीच्या पेट्रोलपंपावर आणून ठेवला आहे. सदरच्या पेट्रोल पंपाच्या शेजारी त्यांच्याच मालकीचे बियर बार व लॉज असून पुतळ्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर पुतळ्याची सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस पुतळा स्वतःच्या मालकीचा आहे. या अविर्भावात स्वतःच्या मोजक्या कार्यकर्त्यांकडून पूजाअर्चा केली जात आहे. त्यामुळे इतर पक्षातील शिवभक्तांना व सामान्य नागरिकांना तेथे ये-जा करणेस अडचण निर्माण होत आहे. तरी जिल्हा व तालुका प्रशासनाने सदरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा, लोकवर्गणीतून निर्माण झालेला पुतळा हा सुरक्षित, शासकीय जागेत रीतसर जिल्हाधिकारी यांचे परवानगी येईपर्यंत स्थलांतरीत करावा व सद्यस्थितीत पुतळा ज्या ठिकाणी आहे. ती जागा मद्यपींच्या वावरामुळे पुतळा ठेवण्यास असुरक्षित आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
          यावेळी भूपेंद्र कांबळे, विजू ताड, सरदार पाटील, युवराज निकम, राजू यादव आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments