जत तहसील कार्यालयात सर्वसामान्यांची लूट; दलालांचा सुळसुळाट; प्रहार संघटनेचा उपोषणाचा इशाराजत/प्रतिनिधी:- जत तहसील कार्यालयात सर्वसामान्यांची लूट सुरू असून हा प्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा प्रहार संघटनेच्यावतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी दिला. बागडे यांनी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हंटले आहे की, तालुक्यातील अपंगांनी तहसील कार्यालयाकडे अंत्योदय योजनेसाठी अर्ज केले आहेत, पण दीड वर्ष उलटून गेले तरी अद्याप त्याचा विचार करण्यात आलेला नाही, यामागे नेमके गौडबंगाल काय आहे? तसेच जमीन वाटपासाठी ८५ प्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पण ते काम कधी होईल सांगता येत नाही. डिजिटल सातबारामध्ये तर शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. चुका अधिकाऱ्यांच्या असताना शिक्षा सर्वसामान्यांना होत आहे.

जत तहसील कार्यालयात दलाल सक्रिय; 85 प्रमाणे अनेक प्रकरणांमध्ये 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत मागणी:-
        तहसील कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांची प्रकरणे अडवून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दलालांमार्फत पैशांची मागणी केली जाते. यासंदर्भात नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, उलट त्यांच्यावर तुम्ही कर्मचाऱ्यांवर असे खोटे आरोप करता असे म्हणून त्यांना हकलवून दिले जाते. दलालांकडून पैसे मागितल्याच्या ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या आहेत. या सर्व बाबींकडे तहसीलदार जीवन बनसोडे हे लक्ष देतील का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. तसेच सक्रिय दलालांचा देखील बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments