जत पश्चिम भागातील ऊसाची तोड कधी? ऊसाला तुरे येऊ लागल्याने शेतकरी धास्तावलेजत/प्रतिनिधी:- साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने होऊन गेले तरी अद्याप ऊस उत्पादक शेतक-यांच्या शेतातील ऊसाची तोड न झाल्याने  शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. वेळेत ऊसतोड न झाल्यास शेतक-यांचे मोठे अर्थिक नुकसान होणार आहे. 
          जत तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैशाळ ऊपसा सिंचन योजनेव्दारे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने या भागात शेतक-यानी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण केली आहे. कुंभारी, कोसारी, बागेवाडी, बिरनाळ, कंठी, विषाणू, बाज, बेळुंखी, हिवरे या गावातील शेतक-यानी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण केली आहे. या भागात जिकडे नजर जाईल तिथपर्यंत सर्वत्र ऊसच दिसत आहे. जत तालुक्यातील पश्चिम भागात जवळपास एक हजार एकर इतका ऊस असून हा ऊस उसतोडणी करणा-या टोळ्या कमी प्रमाणात असल्याने या भागातील ऊस नेणा-या कारखान्यानी ऊसतोडण्यासाठी जादा टोळ्या लावल्या नाहीत तर पुढील काळात या भागातील ऊस तोडणी अभावी शिल्लक राहाणार असल्याने ऊसउत्पादक शेतकरी धास्तावला आहे. 
          जत तालुक्याच्या पश्चिम भागातील ऊस जास्त करून सांगली कारखान्याला जात आहे. तर उर्वरित ऊस हा केंपवाड व जत साखर कारखान्याला जात आहे. ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने यावेळी प्रथमच ऊस उत्पादक शेतकरी आपल्या ऊसाचे करायचे काय या विवंचनेत आहेत. त्यातच टोळीवालेही या संधिचा फायदा घेऊन ऊस उत्पादक शेतक-यांना लुबाडत आहेत. या सर्व प्रकाराची त्वरीत दखल घेऊन साखर कारखान्यानी या भागात बाहेरून जास्तीत जास्त ऊसतोडणी मजूरांच्या टोळ्या आणून एकाही शेतक-याचा ऊस शिल्लक राहाणार नाही यासाठी उपाययोजना करावी अशी अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. 
         जत तालुक्यातील डफळापुर या ठिकाणी श्रीपतराव कदम साखर कारखाना ऊभारण्यात येत असलातरी अद्याप या कारखान्याचे काम पूर्ण झाले नाही. ते पुढल्या वर्षी होईल अशी अपेक्षा उस उत्पादक शेतकरी करित आहेत. तसेच कवठेमहांकाळ चा कारखाना बंद असल्याने याचाही परिणाम ऊस शिल्लक राहण्यात होत आहे.

Post a Comment

0 Comments