आरक्षणासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा जत तालुका मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाकडे लेखी निवेदन


जत/प्रतिनिधी:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता छत्रपती श्री. संभाजीराजे हे मुंबई येथे अमरण उपोषणाला बसले असून शासनाने राजेंच्या व  समाजाच्या सहनशक्तीचा अंत न पहाता मराठा आरक्षणासंदर्भात त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी जत तालुका मराठा समाजाच्यावतीने येथिल तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. 
          छत्रपती संभाजीराजे भोसले हे आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या व ईतर मागण्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात यासाठी आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन अमरण उपोषण सुरू केले आहे. छत्रपती श्री.संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षण घटनात्मक व ५० टक्के ओ.बी.सी.मधूनच झाले पाहिजे, सहा वर्षे झाले दुर्दैवी कोपर्डी घटनेतील भगीनीला तात्काळ न्याय मिळून आरोपींना फाशी झाली पाहिजे, मराठा आरक्षणासाठी आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे शासनाने जे अश्वासन दिले आहे. त्याची अश्वासनपूर्ती त्वरीत करावी, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक व्याज परयावा योजनेची मर्यादा २५ लाख रुपये करावी, सारथी संस्थेला १ हजार कोटी रूपये देऊन त्याचे कोल्हापूर येथे उपकेंद्र सुरू करावे, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी त्वरीत वस्तीगृहे सुरू करावीत, मराठा आरक्षण मधिल १४ हजार आंदोलकावरील गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत. या सर्व मागण्यांची पुर्तता त्वरीत करण्यात यावी या मागण्यांसाठी छत्रपती श्री. संभाजी महाराज हे दि.२६ फेब्रुवारी २०२२ पासून आझाद मैदान मुंबई येथे आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत. 
           त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व त्यांच्या मागण्यांची शासनाने त्वरीत दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी आज जत संस्थानचे व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या नेतृत्वाखाली येथिल तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांना लेखी निवेदन देण्यात आले. 
           यावेळी बोलताना श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे म्हणाले की, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज हे मराठा समाज्याच्या न्यायहक्कासाठी आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पहाण्यास तयार नाही. त्यातच त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. जर छत्रपतींच्या बाबतीत शासन असेच वागत राहीले तर शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याची नोंद घ्यावी असा इशारा ही डफळे यांनी दिला आहे. 
           यावेळी बोलताना मराठा सेवा संघाचे पदाधिकारी श्री. सुधिरदादा चव्हाण म्हणाले राजेंच्या उपोषणामुळे राजेंच्या तब्बेतीला काही झालेस याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. सरकारने राजेंच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात. 
           यावेळी मराठा समाजाचे उमेश सावंत, सुजय उर्फ नाना शिंदे, संतोष भोसले, गणेश गिड्डे, अमर जाधव, मेजर सुनिल चव्हाण, श्रीकृष्ण पाटील, अनिल शिंदे, आदेश जाधव, अतुल मोरे, इंद्रजित  खानविलकर, उमेश पवार, संग्राम राजेशिर्के, कैलास गायकवाड, डाॅ. निलेश चव्हाण, अनिल चव्हाण, सुमित भोसले, सुरेश पवार, सचिन शिंदे, सुनिल जाधव, सुमित कोडग, प्रसाद साळुंखे,धिरज चव्हाण,  विनायक चव्हाण, यशवंतराव चव्हाण  आदी मान्यवर उपस्थित होते. 
         यावेळी जतचे तहसीलदार श्री. जिवन बनसोडे यांना श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी निवेदन दिले. त्यानंतर बोलताना श्री. बनसोडे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या भावना शासनाला कळविण्यात येतील असे अश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments