मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देणार- तुकाराम महाराजजत/प्रतिनिधी:-  आजच्या तरुण पिढीने छोट्या-मोठ्या व्यवसायकडे तसेच व्यावसायिक शिक्षणाकडे वळले पाहिजे. ग्रामीण भागात व्यवसायाला मोठी संधी आहे. तरुणांना ग्रामीण भागात व्यवसाय क्षेत्रात आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे यासाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.
           जत तालुक्यातील कोसारी येथील श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य तथा ग्रामीण विकास संस्थेचे सचिव सागर गुजले यांनी कोसारी येथे कृपा बेकरी अॅण्ड जनरल स्टोअर्स हा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचे उदघाटन ह.भ.प. तुकाराम महाराज व संत निरंकारी मंडळ जत शाखेचे जोतिबा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते नाथा पाटील, लक्ष्मण बोराडे, ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विवेक टेंगले लतीफ मणेर, तानाजी बिसले, बाळासाहेब पवार, संभाजी साळे, मधुकर भोसले, विलास कदम, उत्तम महारनुर, दादासो महारनुर, मधुकर सुर्यवंशी, विघ्नेश चव्हाण, करिश्मा चव्हाण, दादासो टेंगले आदी उपस्थित होते.
          यावेळी बोलताना तुकाराम महाराज म्हणाले की, जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. दुष्काळी तालुक्यामध्ये म्हैसाळचे पाणी दाखल झाल्याने तालुक्यातील काही भागातील शेती सुधारली आहे. तर जत पूर्व भागात आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यातच नवीन पिढीच्या हाताला काम नसल्याने त्यांचे जगणे अवघड झाले आहे. तालुक्यातील तरुण तालुक्याच्या ठिकाणीच राहिला पाहिजे. त्यासाठी तालुक्यात नवनवीन उद्योग उभा राहणे काळाची गरज आहे. तरुणांनी मुंबई-पुणे आदी ठिकाणी न जाता आपल्या गावातच व्यवसाय कसा सुरु करता येईल त्या दृष्टीने प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना या पुढील काळात यासाठी प्रयत्नशील असून तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याकडे कल असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments