एक हात मदतीचा | तुकाराम बाबांकडून जाळीत ग्रस्त कुटुंबियांना मदत

कारखानादारांनी ऊसतोड मजुरांचे नियोजन करावे; तुकाराम महाराज


जत/प्रतिनिधी:- तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे, जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील चार ऊसतोड मजुरांच्या झोपडया जळाल्याची घटना घडली. हातावरचे पोट असणारे हे कुटुंब बेघर झाले, खायला अन्न नाही अशी अवस्था झाली. या घटनेची माहिती मिळताच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे पुण्याहून घटनास्थळी पोहचत त्या ऊसतोड मजुरांच्या कुटूंबियांना धीर देत त्यांना जीवनावश्यक साहित्य व रोख रक्कम देत आधार दिला. यावेळी त्यांच्यासमवेत उमेश घोडके, अभिजीत पाटील, अस्लम अफराद, जयदीप माने, संभाजी लेंगरे आदी उपस्थित होते.
            जत तालुक्यातील व्हसपेठ येथील लेंगरे यांनी ऊसतोड टोळी भरली आहे. सध्या ही ऊसतोडीची टोळी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ज्या ठिकाणी टोळी थांबलेली आहे. त्या ठिकाणच्या झोपडीला आग लागून व्हसपेठ ता.जत येथील रघुनाथ लेंगरे, कवठेमहांकाळ येथील नामदेव लाडगे, रुपेश लाडगे, कर्नाटकातील अमोघसिद्ध हडपद यांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. झोपडतील धान्य, कपडे, भांडी, रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने आग लवकर आटोक्यात आली अन्यथा शेजारी असलेल्या झोपड्याही जळून खाक झाल्या असत्या.
            या घटनेची माहिती तुकाराम बाबा महाराज यांना मिळाली. बाबांनी व्हसपेठ येथील घटनास्थळी असलेले संभाजी लेंगरे यांना सविस्तर माहिती विचारून घेतली. पुणे येथे असलेले तुकाराम बाबा यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी कवठेएकंद गाठले व मदतीचा हात दिला. संपूर्ण झोपडी जळाल्याने हे चारही कुटूंबे अक्षरशः उघड्यावर पडली होती. खायला अन्न नव्हते की पांघरावे म्हटले तर चादर नव्हती अशी अवस्था झाली होती. तुकाराम बाबांच्या या मदतीने या ऊसतोड कुटूंबियांना मोठा आधार मिळाला. बाबांच्या या मदतीने कुटूंबियांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

■ कारखानादारांनी ऊसतोड मजुरांचे नियोजन करावे; तुकाराम महाराज:-
       हातावरचे पोट असलेली ही गरीब मंडळी, पाठीवर बिऱ्हाड घेवून गावोगावी ऊसतोड करत असतात. मागील वर्षी झोपडीत पावसाचे पाणी शिरले ऊसतोड मजुरांचे हाल झाले. आज कवठेएकंद येथे झोपडया जळाल्या ती घरे रस्तावर आली. ज्या माणसांमुळे रानातील गोडवा करखान्यापर्यत पोहचतो व त्याची साखर बनते. तोच ऊसतोड मजूर अडचणीत आल्यास कारखान्यांने, त्या भागातील दानशूर व्यक्तीने तातडीने मदत करणे गरजेचे आहे पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. अपघात, नैसर्गिक घटना आशा घटना घडल्यास कारखान्यानी ऊसतोड मजुराला माणुसकीच्या दृष्टीने मदत करावी असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

Post a Comment

0 Comments