ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी | उमदी ग्रामपंचायतीवरील आरोप सिद्ध न झाल्यास अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल करणार; काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांचा ईशाराजत/प्रतिनिधी: 
           उमदी ग्रामपंचायतीने अत्यंत पारदर्शक कारभार केला असून गावाच्या विकासासाठी शासनाचा निधी खर्च केला आहे. ग्रामपंचायतीने एक रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचे शिवसेनेच्या तथाकथित नेत्याने सिद्ध करावे अन्यथा त्याच्यावर अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल करू, असा इशारा काँग्रेसचे नेते निवृत्ती शिंदे व माजी उपसरपंच रमेश हळके यांनी पत्रकार बैठकीत दिला.
          उमदी ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल शिवसेनेचे विभाग प्रमुख श्रीशेल उमराणी यांनी अनेक आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत आज निवृत्ती शिंदे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले की, उमदी ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अत्यंत पारदर्शक कारभार करण्यात आला आहे. केवळ राजकीय द्वेषातून उमराणी यांनी आरोप केले आहेत. ग्रामपंचायतीबद्दल एकाही व्यक्तीची तक्रार नाही. सामान्य माणसाची कामे केली जातात. ग्रामपंचायतीमध्ये एक रुपयाचा ही भ्रष्टाचार झालेला नाही. पाच कोटी रुपयांचा अपहार झाला हे उमराणी यांचे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.  ग्रामपंचायतीला नेमका किती निधी येतो? किमान याची तरी त्यांनी माहिती घ्यावी मगच असे बिनबुडाचे आरोप करावेत. ग्रामपंचायत सर्व निधी विकास कामावर खर्च करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल मारणे, टाकी बसवणे, पाईप लाईन टाकणे अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. उपलब्ध निधीतून गटारी व रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. उमदी गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सध्याच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी केले आहे. मात्र ते चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करीत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावे की, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार सिद्ध करावा अन्यथा श्रीशैल उमराणी यांच्यावर अब्रू नुकसान भरपाईचा फौजदारी दावा दाखल करू, असा ईशारा शिंदे यांनी दिला.

आरोप सिद्ध न झाल्यास संबंधित स्वयंघोषित नेत्यांना गावात फिरकु देणार नाही; माजी उपसरपंच रमेश हळके:-
शिवसेच्या स्वयंघोषित नेत्यांनी केलेले आरोप हे फक्त आणि फक्त प्रसिद्धीसाठी केलेले आहेत. ग्रामपंचायतीच्या मार्फत एक ही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नसून यामध्ये जर भ्रष्टाचार आढळल्यास आम्ही होणाऱ्या कारवाईस तयार आहोत. मात्र जर आरोप सिद्ध न झाल्यास संबंधित स्वयंघोषित नेत्यांना गावात फिरकु देणार नाही असा इशारा काँग्रेसचे युवा नेते व माजी उपसरपंच रमेश हळके यांनी दिला.

Post a Comment

0 Comments