कोरोनाच्या ‍तिसऱ्या लाटेचा प्रसार थोपविण्यासाठी निर्बंधांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीव्या | व्यापारी, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते संघटनांच्या बैठकीत सहकार्याचे आवाहन


सांगली: कोरोनाची तिसरी लाट देशभरात वाढत असून आपला जिल्हा सुरक्षित राहावा यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध प्रशासनाने लावले आहेत. सर्वांनी याचे काटेकोर पालन करावे. मोठ्या प्रमाणावर संक्रमण वाढल्यास हॉस्पीटल, बेड्स, ऑक्सिजन यासारखे विषय गंभीर होतात. त्यामुळे सर्वांनी निर्बंध पाळून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. व्यापारी, फेरीवाले, भाजी विक्रेते आदि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.   
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी पोलिस अधिक्षकं दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाचा तिसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. व्यापारी संघटना, मार्केट यार्ड प्रतिनिधी, भाजी विक्रेते, फेरीवाले, मंगल कार्यालय संघटना प्रतिनिधी यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून प्रशासनाचे निर्बंध काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच स्वनियमनासाठीही अधिक प्रयत्न करावेत. संघटनांनी आपल्या सदस्यांचे 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. आपला संपर्क अनेक नागरिकांशी येत असल्यामुळे आपण सुपर स्प्रेडर असतो याची जाणीव ठेवून प्रतिबंधात्मक निर्बंध, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सींग, लसीकरण या सर्व बाबींची तंतोतंत पालन व्हावे. सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यास त्वरीत टेस्टींग करून घ्यावे. कोमॉर्बीड असलेल्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोरोनाचा सद्याचा विषाणू हा मोठ्या वेगाने संक्रमण करत असल्यामुळे गर्दीची ठिकाणे, सभा, समारंभ, मंगल कार्यालये या ठिकाणी निर्बंधाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल यासाठी आपणही त्यामध्ये सहकार्य करावे. व्यापारी क्षेत्रातील विविध संघटनांनी आपल्या सदस्यांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी.
पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम म्हणाले, कोरोनाचा प्रसार प्रतिबंधीत करण्यासाठी प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांची अंमलबजावणीसाठी पोलिस ही थेट यंत्रणा असते. त्यामुळे व्यापारी व पोलिस यांच्यामध्ये कोणताही संघर्ष उद्भवू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यावेळी त्यांनी नियमांची पळवाट काढू नये असे आवाहनही केले.
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, प्रशासनाचे नियम, व्यापार आणि आरोग्य यांची व्यवहारीक सांगड घालून आपला उद्योग व्यापार आपण व्यवस्थित करू शकतो. पहिल्या व दुसऱ्या लाटेत यशस्वी मुकाबला करण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य दिलेच आहे. तिसऱ्या लाटेतही कोरोनाचा प्रसार थोपविण्यासाठी सहकार्य द्यावे. व्यापारी संघटनांनी आपल्या सदस्यांसाठी लहान लहान कोविड केअर सेंटर उभे करावी लागल्यास त्यासाठी सहकार्य करावे. सर्व सदस्यांचे, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे.
यावेळी मंगल कार्यालये आणि केटरींग असोसिएशन, सांगली जिल्हा दुध असोसिएशन, फेरीवाले संघटना, सराफ व्यापारी संघटना, भाजी विक्रेते संघटना, पेट्रोल पंप डिलर असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, मारूती रोड व्यापारी संघटना, माल वाहतूकदार संघटना, एपीएमसी संघटना, मिरज व्यापारी असोसिएशन आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मास्क नाही तर माल नाही अशी भूमिका सर्वांचीच राहील असे सांगितले.

Post a Comment

0 Comments