माजी आमदार विलासराव जगताप यांनी तथ्यहीन आरोपाबाबत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा आठ कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू; सुजितसिंह शिंदे, चेअरमन राजाराम संयुक्त शेती संस्थाजत/(जॉकेश आदाटे): काही दिवसांपूर्वी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन सुजय (नाना) शिंदे, कार्याध्यक्ष जत तालुका काँग्रेस व आमच्या संपूर्ण शिंदे कुटुंबियांवर केलेले गंभीर आरोप हे बेबुनियाद व तथ्यहीन आहेत. सदर आरोप मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा रुपये आठ कोटीच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यास सामोरे जावे लागेल अशी माहिती सुजितसिंह शिंदे चेअरमन राजाराम संयुक्त शेती संस्था व सुजय (नाना) शिंदे कार्याध्यक्ष जत तालुका काँग्रेस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सत्यजित शिंदे उपस्थित होते.
         यावेळी बोलताना सुजितसिंह शिंदे म्हणाले की, वास्तविक मौजे को. बोबलाद येथील सदर जमिनी आमच्या व्यक्तिगत मालकीच्या आहेत. सदर शेतजमिनी दि राजाराम फार्मिंग सोसायटीने महाराष्ट्र शासनाकडून विकत घेतलेल्या मालमत्ता असून: फार्मिंग सोसायटी विसर्जना अनवये या मालमत्ता (शासन निर्णयास अनुसरून) सभासदाच्या नावे वर्ग झाल्या आहेत. आमच्या संस्थेचे सर्व सदस्य सहकारी शेती संस्थेच्या आदर्श उपविधीतील तरतुदींना अनुसरूनच सभासद झाले आहेत. सध्यस्थितीत सदर मालमत्तेचे आम्ही व्यक्तिगत मालक आहोत. सदर मालमत्तांवर कोणत्याही प्रकारचा बोजा अथवा शेरा नसून, सदर जमिनी वर्ग १' मधील आहेत. त्यामुळे सदर जमिनींची विक्री करणे अथवा अन्य तऱ्हेने तबदील करणे हा आमचा व्यक्तिगत मामला आहे.
         विलासराव जगताप हे स्वतः विधानसभा सदस्य होते, ते अनुभवी आहेत. ते स्वतः आमदार असताना, महसूल व सहकार खात्याकडे तक्रारी करून आमच्या संस्थेची व सदर मालमत्तांबाबत चौकशी केली होती. सदर चौकशीतून आमच्या कारभाराचे निर्दोषत्व सिद्ध झाले होते. आम्ही सर्व प्रक्रिया कायदेशीररीत्या पार पाडलेची जाणीव असतानाही, त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे फेरफार नोंदी अन्वये सार्वजनिक असतानाही - आमची आर्थिक, राजकीय व सामाजिक प्रतिष्ठेची हानी करणेकामी त्यांनी जाणीवपूर्वक हे आरोप केले आहेत.

Post a Comment

0 Comments