ब्रह्मज्ञानानेच परिपक्व होऊ शकतो ईश्वरावर विश्वास- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
 ‘‘कोणत्याही काल्पनिक वस्तूवर आपण तोपर्यंत विश्वास ठेऊ शकत नाही जोपर्यंत ती वस्तू आपण प्रत्यक्ष पाहत नाही. अगदी तशाच प्रकारे ईश्वरावर आपला विश्वास तेव्हाच परिपक्व होऊ शकतो जेव्हा ब्रह्मज्ञानाद्वारे आपण त्याला जाणून घेतो. ईश्वरावर दृढ विश्वास ठेऊन जेव्हा मनुष्य आपला जीवनप्रवास भक्तिभावाने युक्त होऊन व्यतीत करतो तेव्हाच तो जीवन प्रवास आनंददायक होतो.   
वरील उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्हर्च्युअल रूपात आयोजित केलेल्या तीन दिवसीय 74व्या वार्षिक निरंकारी सन्त समागमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या सत्संग समारोहामध्ये मानवमात्राला संबोधित करताना व्यक्त केले. संत समागमाचे थेट प्रक्षेपण मिशनची वेबसाईट तसेच साधना टी.व्ही.चॅनलवरुन केले जात आहे ज्याचा लाभ जगभरातील भाविक-भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन घेत आहेत.
सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की एका बाजुला विश्वासावर चर्चा करत असताना  दुसऱ्या बाजुला अंध विश्वासाची बाबही पुढे येते.  अंध विश्वासातून भ्रम उत्पन्न होतात, भीती निर्माण होते आणि मनामध्ये अहंकाराचा प्रवेश होतो ज्यामुळे मनामध्ये वाईट विचार येतात; परिणामी कलह-क्लेषांचा सामना करावा लागतो. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू विश्वासावर टिकून आहेत; तथापि विश्वास असा नसावा की वास्तविकता काहीतरी वेगळीच आहे आणि आमच्या मनातील कल्पना काही वेगळीच आहे. डोळे बंद करुन किंवा एखाद्या वास्तविकतेकडे डोळेझाक केल्याने आपण अंधविश्वासाकडे अग्रेसर होतो. एखाद्या कृतीमागील उद्देश जाणून न घेता आणि ती तर्कसंगत नसतानाही केवळ करत जाणे हेच अंधविश्वास किंवा अंधश्रद्धेचे मूळ होय. त्यामुळेच मनामध्ये नकारात्मक भावनांचा प्रभाव वाढू लागतो. 
सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की आजुबाजूचे वातावरण, व्यक्ति किंवा वस्तूंपासून स्वत:ला दूर करने म्हणज भक्ती नव्हे. भक्ति आम्हाला जीवनाच्या वास्तविकतेपासून पलायन करायला शिकवत नाही. उलट जबाबदाऱ्यांचा निर्वाह करत असतानाच क्षणोक्षणी ईश्वराची जाणीव ठेवून आनंदाने जीवन व्यतीत करणे ही खरी भक्ती होय. भक्ति ही कोणाची नक्कल करण्याचे नाव नसून प्रत्येकाचे व्यक्तिगत मार्गक्रमण आहे. नित्यप्रति ईश्वराशी नाते जोडून आपली भक्ती मजबूत करायची आहे. मनामध्ये इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे; परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून निराश होऊ नये.  अनासक्त भावनेने आपला विश्वास पक्का ठेवण्यातच आपले भले आहे. असे केल्यानेच मनुष्य खऱ्या अर्थाने शाश्वत आनंदाची अनुभूती घेऊ शकतो. 
सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला ज्यामध्ये देश-विदेशातील सेवादल बंधु-भगिनींनी भाग घेतला.  या  सेवादल रॅलीमध्ये विविध खेळ, शारीरिक कवायत, साहसी कृती, मानवी मनोरे, माइम ॲक्ट यांच्या व्यतिरिक्त मिशनच्या शिकवणूकीवर आधारित सेवेची प्रेरणा देणाऱ्या लघुनाटिका व गीतरचना मर्यादांचे पालन करत प्रस्तुत करण्यात आल्या.
सेवादल रॅलीला आपले आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की तन-मनाला स्वस्थ ठेवून समर्पित भावाने सेवा करणे प्रत्येक भक्तासाठी आवश्यक आहे मग ती सेवा गणवेष परिधान करुन केली जात असो अथवा गणवेषाशिवाय केलेली असो. सर्वांभूती परमात्म्याला पाहून आम्ही आपल्या घरी, समाजामध्ये मानवतेच्या प्रति मनामध्ये सद्भाव बाळगून जे कोणतेही कार्य करत असतो तेही एक सेवेचेच रूप आहे. सेवा करत असताना विवेक आणि सजगता बाळगणेही अत्यंत गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments