उमदी येथील पोलीस वसाहतीची दुरावस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष; दुरुस्तीची मागणीजत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील उमदी येथील पोलीस वसाहतीची पूर्णपणे वाताहात झाली असून जूनी घरे पाडून सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज असे नवीन पोलीस वसाहत निर्माण करावी, अशी मागणी भाजपाचे युवा नेते संजय तेली यांनी केली आहे.
           उमदी पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची मोठी दुरावस्था झाली आहे. पोलीस ठाण्याच्या पाठीमागील जागेवर ब्रिटिश काळापासून घरांची वसाहत उभारलेली आहे. ही निवासस्थाने अत्यंत जुनाट झाली असून, बांधकामानंतर निवासस्थानाच्या दुरुस्तीकडे व डागडुजी, रंगरंगोटी कामाकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने निवासस्थानाची अशी बकाल अवस्था झाल्याचा आरोप पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे .घराच्या छतावरील जुन्या पद्धतीचे कवले जागोजागी फुटल्याने पावसाळ्यात सर्वच घराला गळती लागते. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटूंब असुरक्षित असल्याचे चित्र आहे.
         तसेच ड्रेनेज लाईन, नाल्याची मोठी समस्या येथे भेडसावत आहे. घरांच्या जुन्या झालेल्या भिंतींना तडे गेले असून, काही भिंती पडल्या आहे. त्यामुळे आडोसा म्हणून ताडपत्री किंवा टिन पत्रांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येते. याशिवाय जागोजागी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने डासांचा उपद्रव व वराहांच्या मुक्त संचाराने आरोग्य धोक्यात आले आहे. काटेरी झुडपांमुळे सर्प, विंचवाची भीती- निवासस्थानाच्या आजुबाजूला मोठमोठाली काटेरी झुडपे वाढली आहे. त्यामुळे परिसर घनदाट जंगला प्रमाणे दिसत आहे. या अडचणीमुळे साप, विंचू व आदी विषारी जिवांची भीती बाळगून पोलिसांच्या कुटूंबाला जीवन जगावे लागत आहे.

  • राहण्याजोगे एकही घर नाही -
  •            येथील पोलिस निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे निवासस्थानांमध्ये राहणार्‍या पोलिसांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. यातील एकही घर राहण्याजोगी उरले नाही. त्यामुळे सध्या केवळ 15 ते 20 कुटूंब येथे वास्तव्यास असून, अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करून भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. प्रस्ताव पाठवून तीन वर्षे लोटली- तीन पोलिस अधिकारी व ५०-६० पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची राहण्याची सोय होईल या दृष्टीने वसाहतीच्या नूतनीकरणासाठी विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून, या प्रस्तावाला दोन वर्षे लोटली, मात्र अजूनही काही झाले नाही.
  • उमदी येथील पोलीस निवासस्थानांची मोठी दुरावस्था झाली असून, यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. येथे राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना परिसरातील अस्वच्छतेचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन घरांची संख्या वाढवावी तसेच जुन्या घरांची दुरूस्ती करून ते वापरण्यायोग्य बनवावेत, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments