जतची श्री यल्लमादेवी यात्रा ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंधात होणार : प्रशासन व श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानचा निर्णय
जत/प्रतिनिधी:  जत नगरिची ग्रामदेवता, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे व नवसाला पावणारी देवी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री. यल्लमादेवीची यात्रा दि. ३० डिसेंबर २०२१ ते दि.५ जानेवारी २०२२ या कालावधीत भरविण्यात येत असून या यात्रेसंदर्भात श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत व जत प्रशासनाच्यावतीने यात्रा स्थळावर यात्रा नियोजनासंदर्भात बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. 
          या बैठकिच्या अध्यक्षस्थानी जत संस्थानचे नरेश व श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे हे होते. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे, तहसिलदार जिवन बनसोडे, पोलीस उपाधिक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उदय डुबल, जतनगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश  वाघमोडे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, तालुका वैद्यकिय अधिकारी संजय बंडगर, यललमादेवी प्रतिष्ठान जत च्या विश्वस्त श्रीमंत ज्योस्नाराजे डफळे त्याच प्रमाणे विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
          यावेळी बोलताना जतचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटारे म्हणाले, ओमायक्राॅनच्या राज्यातील वाढत्या संक्रमामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झाले असून प्रशासनाने जिल्ह्यात भरविण्यात येणारे यात्रांवर निर्बंध घातले आहेत. प्रशासनाने मंदिर बंद संदर्भात निर्णय न घेतल्याने यात्रेमध्ये येणारे भाविक भक्तांना कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करित देविचे दर्शन घेता येणार आहे. या यात्रेत कोणत्याही प्रकारचे स्टाॅल्स व करमणूकीची साधने यात्रा परिसरात लावता येणार नाहीत. तसेच देविला जे नारळ फोडण्यात येणार आहेत ते न फोडता ते देविला अर्पण करावयाचे आहेत. तसेच कोरोनाच्या दोन लसी घेतलेल्या व्यक्ती यांनाच दर्शन घेता येणार आहे. साठ वर्षावरील व्यक्ती व लहान मुले यांनी  यात्रेत येऊ नये असे आवाहन ही प्रांताधिकारी यांनी केले आहे. तसेच यात्रेत प्रशासनाने एका  कंट्रोलरूमच्या माध्यमातून यंत्रणा राबवायची आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने आपली आरोग्य यंत्रणा वाहनासह सज्ज ठेवावी तसेच ओमायक्राॅनचे संक्रमण असलेल्या कर्नाटक राज्यातील व मुंबई येथून येणारे भक्तांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना ही प्रांताधिकारी यानी आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासनाला केल्या.
           यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले म्हणाले नुकतीच पार पडलेली गुड्डापूर येथिल श्री धानम्मादेवीची यात्रा ज्या प्रमाणे पार पडली त्याप्रमाणेच जत येथिल श्री यल्लमादेवी ची यात्रा कोरोनाचे पार्श्वभूमीवर पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
         यावेळी बोलताना श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे म्हणाले प्रशासनाने ओमायक्राॅनच्या पाश्वर्वभूमिवर यात्रेकरिता जे निर्बंध लावले आहेत. त्याचे प्रतिष्ठान चे माध्यमातून पालन केले जाईल. यात्रेकरिता प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी यांचे प्रशासनाला सहकार्य असेल. यात्रेत सर्व भक्तांनी मास्कचा वापर करावा. श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान चे वतीने मोफत मास्क पुरविण्यात येणार आहेत तरी यात्रेकरूनीही कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन ही श्री डफळे यांनी केले. 
         यावेळी बोलताना जतचे तहसिलदार जिवन बनसोडे व जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यानी यात्रेकरिता ज्या उपाययोजना करता येतील त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी प्रशासन प्रतिष्ठान ला सर्वोतोपरी सहकार्य करेल असे सांगितले. यात्रेत ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर कोणतेही स्टाॅल लावण्यात येणार नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे कृषी प्रदर्शन व जनावरांचा बाजार रद्द करण्यात आल्याचे बाजारसमितीचेवतीने जाहीर करण्यात आले. 
          यावेळी श्री. यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अनिल शिंदे, गणपतराव कोडग, अरूण उर्फ बारू शिंदे, संग्राम राजेशिर्के,शिवसेना नेते श्री. दिनकर पतंगे, मोहन चव्हाण,  मोहन माने-पाटील,श्रीकृष्ण पाटील,प्रा. कुमार इंगळे, पापा सनदी, चंद्रकांत कोळी, विश्वनाथ सावंत देविचे पुजारी श्री. सुभाष कोळी, स्वप्निल कोळी, सुरेश कोळी, जतचे मंडलअधिकारी संदिप मोरे, तलाठी रविंद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. 
         शेवटी तहसिलदार जिवन बनसोडे यानी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments