जत तालुका पत्रकार गृहनिर्माण सोसायटीची प्रांत आणि जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशी होणार

जत मधील पत्रकार यांच्या आंदोलनाला यश; जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासनजत/प्रतिनिधी: 
         जत तालुका पत्रकार गृहनिर्माण सोसायटी मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत आज ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी सोसायटीच्या प्रांताधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  
          जत पत्रकार गृहनिर्माण सोसायटी मध्ये अपात्र व्यक्तींना प्लॉट देण्याचा तसेच प्लॉट मंजूर असताना 34 ते 37 जणांना कब्जेपट्टी देण्याचा प्रकार झाला असून अध्यक्ष म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीने अनेक वेगवेगळे प्रकार केल्याचे पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी, कार्याध्यक्ष बलराज पवार, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील, तालुका उपाध्यक्ष राहुल संकपाळ, सोमनिंग कोळी, विजय नाईक, बादल सर्जे, जॉकेश आदाटे, गोरख भोसले, बसवराज अलगुर, पांडुरंग कोळ्ळी, बाळासाहेब बुद्धसागर, महादेव खांडेकर आदी सहभागी झाले होते. 
          यावेळी पत्रकारांनी दिवसभर निदर्शने केली. त्यांना अनेक वकिलांसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेटून पाठिंबा दर्शवला. सायंकाळी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी पत्रकारांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत प्रत्येक प्रकरण व्यक्तिशः समजून घेतले आणि या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी आंदोलन मागे घेतले. पत्रकारांच्या नावाने बोगस लोकांना प्लॉट देणाऱ्या आणि जिल्हाधिकार्‍यांची परवानगी न घेताच बेकायदेशीररित्या सभासद ठरवणाऱ्या तथाकथित अध्यक्षावर फसवणूक झालेल्या प्रत्येक सभासदा मार्फत फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा वाघमारे यांनी यावेळी केली.

Post a Comment

0 Comments