जतेत जिल्हा बँकेच्या सहकार विकास पॅनल प्रचाराचा शुभारंभ

◆राष्ट्रवादी प्रामाणिक काम करेल ; ना. जयंतराव पाटील
◆कार्यकर्त्यांनी गाफील राहुन चालणार नाही; ना. विश्वजीत कदम
◆जत मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बंद खोलीत चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम कायम?जत/प्रतिनिधी: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे बँकेतही आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना एकत्र आलो आहोत. तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित जागांसाठी निवडणूक होत आहे.
         जत तालुक्यात आमच्या पक्षात प्रवेश केलेल्यानी भाजपसोबत सलगी केली आहे. पण येथे पक्ष भूमिका चालणार नाही, ती आम्ही खपवून घेणार नाही. जतमधून आ. विक्रमसिंह सावंत व इतर मागास गटातील मन्सूर खतीब मोठ्या फरकाने विजयी होतील, असा दावा  पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी केला. जिल्हा बँकेच्या सहकार विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ जत येथे सोमवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
         ना. जयंतराव पाटील म्हणाले, आज राज्यात काही मोजक्याच जिल्हा बँका सक्षमपणे चालू आहेत. यात सांगलीच्या बँकेचा नंबर लागतो खऱ्या अर्थाने ही बँक शेतकऱ्यांसाठी काम करते आहे. राज्यातील एक मजबूत आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणारी ही बँक आहे. हे करत असताना बँकेने गेली सात वर्षे ऑडिट वर्ग 'अ' ठेवला आहे. हे केवळ चांगली माणसे बँक हाताळत असल्याने शक्य झाले आहे. शेतकर्यांच्या विकासाची बँक आपलीच पाहिजे तर शेतकऱ्यास आर्थिक कर्ज पुरवठा करण्याकरिता चांगली माणसे बँकेत निवडून जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आ. सावंत व मन्सूर खतीब यांच्या पाठीशी ताकद उभी करावी असे आवाहनही नामदार जयंत पाटील यांनी केले.
         सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यावेळी म्हणाले की, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात ही बँकेच्या रूपाने महाविकास आघाडी असावी यासाठी जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी एकत्रित बसून हा निर्णय घेतला आहे. त्यातूनच सहकार विकास पॅनेलची उभारणी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी गाफील राहुन चालणार नाही. राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. बँकेत चांगल्या माणसांची गरज आहे. चांगल्या विचारांची माणसे पाठवण्यासाठी आमदार विक्रमदादा सावंत व मन्सूर खतीब त्यांच्या पाठीशी रहावे असे आवाहनही ना. विश्वजित कदम यांनी केली.
         यावेळी आमदार अनिल बाबर म्हणाले की, जत सारख्या दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी ना. जयंत पाटील व ना. विश्‍वजित कदम हे कायम प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व त्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी च्या सर्व उमेदवारांना निवडून दिले पाहिजे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
         यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वैभव शिंदे, मन्सूर खतीब, जयश्रीताई पाटील, अनिताताई सगरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महेंद्र लाड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रमेश पाटील, सुरेश शिंदे (सरकार), पालकमंत्र्यांचे सहायक सचिव अमोल डफळे, बाळासाहेब होनमोरे, चिमण डांगे, हणमंत देशमुख, जि.प. सदस्य सरदार पाटील, महादेव पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराया बिरादार, कार्याध्यक्ष सुजय शिंदे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, हर्षवर्धन चव्हाण, विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश हुवाळे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, नगरसेवक लक्ष्मण एडके, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments