संख येथे कौशल्य आधारित शेतकरी व शेतमजूर प्रशिक्षण संपन्न

संख येथे कौशल्य आधारित शेतकरी व शेतमजूर प्रशिक्षण संपन्न । फळबाग लागवड करणे केव्हाही फायदेशीरच; डाळिंब तज्ञ डॉ. बी. टी. गोरे


जत/प्रतिनिधी:- शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करायचा असेल तर निसर्गानी दिलेल्या देणगीचा पुरेपुर उपयोग करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे. दुष्काळी जतसाठी डाळिंब फळबाग लागवड करणे केव्हाही फायदेशीरच आहे. या भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब फळबाग लागवडीकडे आकर्षित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपदन डाळिंब तज्ञ डॉ. बी. टी. गोरे यांनी केले.
       महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), श्री संत बागडेबाबा  मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य व संख डाळिंब उत्पादक शेतकरी स्वयंसहायता गट यांच्या संयुक्त विद्यमाने संख येथील बाबा महाराज मंगल कार्यालयात शुक्रवारी कौशल्य आधारित शेतकरी व शेतमजूर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ. गोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम महाराज होते.
        तत्पूर्वी डाळिंब तज्ञ डॉ. बी. टी. गोरे, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम महाराज, संखच्या सरपंच पाटील, तालुका कृषी अधिकारी हणमंतराय मेडीदार, आत्माचे रविकिरण पवार यांच्या हस्ते जत पूर्व भागातील डाळिंब व्यापारी संगाप्पा पुजारी, चन्नाप्पा तेली, बनागय्या हिरेमठ, डाळिंब उत्पादक शेतकरी विठ्ठल वाघोली, चंद्रशेखर हिरेमठ, रावसाहेब कोट्याळ, अर्जुन माळी, धानाप्पा कापसे, आण्णाप्पा कुंभार बसवराज राचगौंड यांचा सत्कार करण्यात आला.
         डॉ. गोरे यांनी आपल्या अडीच तासाच्या व्याख्यानात डाळींब लागवड ते विक्री पर्यत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. डॉ. गोरे म्हणाले की, डाळिंब ही शेती केव्हाही फायदेशीर आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंब लागवडीपासून नियोजन करणे गरजेचे आहे. डाळिंबाची लागवड करताना किती अंतर ठेवावे, खड्डा किती खोल असावा, रोपांची वाढ होताना, फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन केले.
■ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार; तुकाराम बाबा महाराज-
जत तालुक्यातील शेतकरी हा कष्टकरी आहे. या शेतकऱ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्याची आर्थिक प्रगती होवू शकते. कृषी विभागाशी संलग्न राहत श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही पुढील काळात शेतकऱ्यांच्या विविध विषयावर प्रशिक्षण वर्ग आयोजित करणार आहे. त्यासाठी संख येथील बाबा मंगल कार्यालय मोफत देण्याबरोबरच येणाऱ्या शेतकऱ्यांचे नाष्टा व जेवणाची सोय श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे तुकाराम महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments