जत पूर्व भागासाठी तुबची बबलेश्वर ही योजना तात्पुरत्या स्वरूपात राबवू; कर्नाटकचे माजी मंत्री एम.बी.पाटील । जत तालुक्याला सामाजिक न्याय विभागातून दोन कोटींचा निधी; मंत्री विश्वजीत कदम

 जत पूर्व भागासाठी तुबची बबलेश्वर ही योजना तात्पुरत्या स्वरूपात राबवू; कर्नाटकचे माजी मंत्री एम.बी.पाटील

जत तालुक्याला सामाजिक न्याय विभागातून दोन कोटींचा निधी; मंत्री विश्वजीत कदम


जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मागे ताकत लावून संपूर्ण तालुका पाणीमय करू, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. जत तालुका कॉग्रेसच्या वतीने संख येथे शेतकरी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.

        यावेळी कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, आमदार एम.बी. पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विशाल पाटील, कर्नाटकचे माजी आमदार जी. टी.पाटील, तमन्ना हंगरगी, सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जत तालुका अध्यक्ष अप्पाराया बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

        गृहराज्यमंत्री सतेज पाटील पुढे‌ म्हणाले, जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने पाहत असून येत्या काळामध्ये जत तालुक्याच्या पाणी प्रश्न नक्की सोडविला जाईल, यावेळी अनेक युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे ना.पाटील यांनी स्वागत केले. जो विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, तो विश्वास सार्थ ठरविणे ही आमची जबाबदारी आहे. काही महिन्यांपासून आपले शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मात्र, पंतप्रधान यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. या शेतकरी विरोधी कायद्यांचा आपण सर्वांनी जमेल तसा विरोध केला पाहिजे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

        माजी मंत्री एम.बी.पाटील म्हणाले, आम्ही तुबची बबलेश्वर योजना करत असताना त्यावेळी स्वर्गीय पतंगराव कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विक्रम सावंत यांनी पाठपुरावा केला होता. परंतु त्या वेळी महाराष्ट्र सरकारकडून निर्णय होण्यास वेळ झाला. त्यामुळे जतचा या योजनेत समावेश झाला नाही. तरीही आज ओवरफ्लो ने या योजनेतून जत तालुक्याला पाणी येत आहे. शिवाय दरवर्षी मानवता धर्मातून पाणी सोडावे अशी विनंती जत तालुक्यातून होते आमदार सावंत हि पाठपुरावा करतात त्यामुळे आम्ही पाणी देत आहोत.

         जत तालुक्याला म्हैशाळ योजनेतून पाणी मिळेपर्यंत तुबची योजनेतून पाणी देण्यासाठी मी पुढाकार घेण्यास तयार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमई यांचे मन वाळवून एक तात्पुरती योजना राबवून त्यातून पाणी देता येईल परंतु यासाठी महाराष्ट्राने दरवर्षी तीन टीएमसी पाणी द्यावे हे पाणी मिळाल्यानंतर आम्ही दोन आवर्तनाच्या माध्यमातून जतला एक ते दीड टीएमसी पाणी देऊ या प्रस्तावावर नामदार सतेज पाटील आमदार विश्वजीत कदम यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करावा असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

      मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, जत तालुक्याला सामाजिक न्याय विभागातून दोन कोटींचा निधी देत आहोत. जत तालुक्याला आमचे नेहमीच झुकते माप राहिले आहे. या तालुक्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने काम करत आहोत. आपण सर्वांनी काँग्रेसच्या पाठीशी ठाम राहावे, आमदार विक्रमसिंह दादा सावंत आज विधानसभेत ताकदीने काम करत आहेत. शिवाय या तालुक्याच्या विकासाकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे बारकाईने लक्ष आहे. येणाऱ्या काळात दादानि दिलेली सर्व आश्वासने पूर्ण होतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

        यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, एम.बी.पाटील यांच्या मनात जत तालुक्यातील जनतेची तळमळ दिसत आहेत. त्यामुळे ते या भागाला पाणी देण्यासाठी पुढाकार घेतात. जत तालुक्यातून ९ जिल्हा परिषद सदस्य आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या माध्यमातून निवडून आणू,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

       आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले, जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आहे, मला या जनतेने विधानसभेत पाठविले आहे. जत तालुक्याला ६ टिएमसी पाणी उपलब्ध केले आहेत. त्याबद्दल शंकाकुशंका आहेत. म्हैसाळचे पाणी जत तालुक्यात फक्त ९ टक्के भागात आले आहे. त्यासाठी आम्हाला ४०-४२ वर्षे लागली आहेत. या योजनेसाठी भाजपाकडून काहीही निधी आलेला नाही. आमचे खासदार प्रतिक पाटील यांच्यामुळे म्हैसाळला निधी मिळाला होता. आमची नियोजित विस्तारित योजना पुर्ण करा, मात्र त्यासाठी आमची आणखीन एक पिढी जाऊ नये, गतीने मंजूरी देण्यासाठी प्रयत्न करावेत. कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पावसाळ्यात पाणी आल्याने सात तलाव भरण्यात आले आहेत. कर्नाटकातून सोडलेले पाणी येत्या काही दिवसात सोनलगी पर्यत पोहचेल. मला जतचा शेतकरी सुखी झालेला पाह्याचे आहे. त्यासाठी मी पुर्ण क्षमतेने येणाऱ्या काळात काम करीन. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकेल हे निश्चित.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पाराय बिराजदार यांनी केले व स्वागत सुजय नाना शिंदे यांनी केले तर आभार बाबासाहेब कोडग यांनी मानले.

यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, दिलीप वाघमोडे, अरुण साळे, किसन व्हनखंडे, माणिक वाघमोडे, आमीन नदाफ, धनाजी पाटील यांच्यासह अनेक गावच्या सरपंच, सदस्यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.


Post a Comment

0 Comments