एक गाव एक गणपती राबविणाऱ्या गावांना गणेश मूर्ती व वृक्ष देणार भेट; हभप तुकाराम बाबा महाराज

११ वर्षांपासून तुकाराम बाबांचा अभिनव उपक्रम


जत/प्रतिनिधी: श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून मंगळवेढा तालुक्यात तर २०१९ पासून जत तालुक्यात 'एक गाव एक गणपती' राबविणाऱ्या गावांना गणेश मूर्ती भेट देण्यात येते यंदाही एक गाव एक गणपती राबविणाऱ्या मंडळाला गणेश मूर्ती, वृक्षारोपन करण्यासाठी वृक्ष तसेच २०० मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार आहेत. मंडळांनी सहा सप्टेंबर पर्यत संपर्क साधावा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रुपेश पिसाळ, विवेक टेंगले, समीर अपराध, सलीम अपराध, बंडा भोसले आदी उपस्थित होते.
       सांगली जिल्ह्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा कहर आजही सुरूच आहे. जत तालुक्यात कोरोनामुळे आतापर्यत ३०६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच आतापर्यत कोरोनाचे १३ हजार ६११ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या या महामारीत आपल्याच लोकांना जीव गमवावा लागत आहे. तेव्हा उत्साहाच्या भरात गणेश उत्सव साजरा न करता शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे, सोशल डिस्टन्सचे पालन करत, जतसह सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, आपण उत्सव साजरा करतो ती आपली संस्कृती टिकावी यासाठी. मागील वर्षी ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला होता तसाच आदर्श गणेशोत्सव साजरा करून प्रशासनाला मनापासून सहकार्य करा.
       श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य आम्ही हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला व अनेक गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदाही आम्ही एक गाव एक गणपती बसविणाऱ्या गावासोबत राहणार आहोत. ज्या गावात शासकीय नियमांचे पालन करत एक गाव एक गणपती बसविण्यात येणार आहे. त्या गावाला श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे गणेश मूर्ती तर देणार आहोतच पण त्याचबरोबर यंदा वृक्ष भेट देणार आहोत. कोरोनाच्या या काळात अनेकांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाला आहे. भविष्यात प्रदूषण हटून ऑक्सिजन मुबलक मिळावा हाच यामागचा उद्देश आहे. गणेश मूर्तीसाठी मानव मित्र संघटनेच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
 देणगी, वर्गणीचा हट्ट नको- तुकाराम बाबा महाराज-
सध्याचा काळ हा बिकट काळ आहे. सर्वाचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. गणेशोत्सव हा आपला उत्सव आपण दरवर्षी थाटामाटात साजरा करतो त्यासाठी देणगी, वर्गणी मंडळे जमा करतात. सध्याच्या या काळात मंडळानी सामाजिक बांधिलकी जपत साधेपणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा. देणगी, वर्गणी मागू नये असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments