जत शहरातील कचऱ्याच्या समस्येवर भाजपच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

हॉस्पिटल फुल्ल, नगरपरिषद गुल अशी शहराची अवस्था; प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांना निवेदन


जत/प्रतिनिधी:  शहरात सर्वत्र घाणीचे सामाज्र पसरले आहे. ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणजे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. जत नगर परिषदेने ठीक ठिकाणी साचलेला कचरा त्वरित हटवावा या मागणीसाठी जत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चच्या वतीने  ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी जत नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.
       निवेदनात म्हटले आहे, शहरात अनेक प्रकारच्या कचऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. सुमारे ५०,००० लोकसंख्या असलेल्या शहराचे इतकी भयंकर अवस्था यापुर्वी कधीही झाली नव्हती. मुख्य बाजारपेठ, प्रमुख रस्त्यांवर कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. उपनगरांची अवस्था तर फारच वाईट झाली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्यांना याचे गांभीर्य नाही. नगरपरिषद प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते ही बाब चिंताजनक आहे. दरवर्षी सुमारे दीड एक कोटीचा निधी कचरा निर्मुलनासाठी खर्च होतो. नगरपरिषदेची स्वतःची वाहने आहेत, पुरेसे कर्मचारी आहेत. फक्त योग्य नियोजना अभावी सर्व मातीमोल ठरत आहे. कोट्यावधींच्या कचरा ठेक्यावर व ठेकेदारावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. कचरा ठेका फक्त कागदोपत्री व मलई खाण्यासाठी कारभार मात्र बोंबाबोंब असे चित्र पहावयास मिळत आहे.
        कचरा ठेक्याचा कारभार सुसुत्रित व काटेकोर करण्यात यावे. त्याचप्रमाणे शहरात रोगराईचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे डासाचे प्रमाणे वाढले आहे, परिणामी डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने जनता त्रस्त झाली आहे. आधीच कोरोनामुळे मंदी त्यात वारंवारच्या वैद्यकीय खर्चाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हॉस्पिटल फुल्ल, नगरपरिषद गुल अशी अवस्था शहराची झाली आहे. नगरपरिषदेचे ढिसाळ नियोजन, नाकर्तेपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डांस निर्मुलनासाठी स्वतंत्र यंत्रणा लावणे गरजेचे आहे. सध्या त्वरीत डास निर्मुलन फवारणी मारणे अत्यंत आवश्यक आहे त्वरीत अंमलबजावणी व्हावी. तसेच सध्या अनेक प्रभागात कामे मंजूर आहेत. पण काही कारणास्तव त्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात येत नाहीत. काही प्रभागात तर फक्त भाजपाचा नगरसेवक असल्याने वर्क ऑर्डर दिल्या जात नाहीत. हे पूर्णतः नियमबाह्य आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तरी सर्वच मंजूर कामांना वर्क ऑर्डर देऊन कामे पूर्ण करावीत. 
        तसेच सध्या पाऊस मोठया प्रमाणात पडत असून शहराच्या अनेक भागात चिखलाचे प्रमाण फार वाढले आहे. किरकोळ पाऊसातही रस्ते चिखलमय होत असल्याने धड चालताही येत नाही, चिखलामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशा चिखलमय रस्त्याचे तात्काळ मुरमीकरण करावे, स्ट्रीट लाईटचे टेंडर हे एका ठेकेदाराकडे आहेत. या ठेकेदारांने बसविलेल्या शहरातील बऱ्याच स्ट्रीट लाईट बंद असून जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात. त्यांचा नागरिकांना फटका बसत आहे. बंद स्ट्रीट लाईट तात्काळ बसवाव्यात, कचरा उठाव त्वरित करण्यात यावा या मागणीसाठी भाजपाच्या वतीने ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
       यावेळी संग्राम जगताप, आण्णाप्पा भिसे, सद्दाम आत्तार, अरविंद कोळी, प्रमोद हिवरे, श्रीदेवी जावीर, प्रकाश माने, दिप्ती सांवत, जयश्री मोटे, मिथून भिसे, गौतम ऐवळे, अजिंक्य सांवत, उमेश सांवत, संतोष मोटे, आकाश सगरे, प्रकाश मोटे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments