दरीबडची येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू; दहा जण ताब्यातजत/प्रतिनिधी: दरीबडची ता.जत येथील दिलीप महादेव वाघे (वय २६) या तरुणाला जबर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास उजेडात आली.
       याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दरीबडची - सिद्धनाथ मार्गावरील वनविभागात मोटारसायकलवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. या घटनेची माहिती जत पोलिसांना मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदर मयत तरुण हा दरीबडची येथील असून त्याचे नाव दिलीप महादेव वाघे असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असता तरुणाचा मृत्यू हा मोटारसायकलवरून पडून नव्हे तर त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पुढील तपासासाठी जत पोलिसानी मयत दिलीप वाघे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दिलीप वाघे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या पाठीवर जबर मारहाण केल्याने संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती तसेच त्याचा एक हातही मोडला होता.
       ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यानी दिलीप वाघे याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृत्यू हा मारहाणीत नव्हे तर अपघातात झाला असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. मयत दिलीप वाघे याचा मृतदेह दरीबडची सिद्धनाथ दरम्यानच्या वनविभागात आणून टाकला तसेच त्याची मोटारसायकल ( एमएच- १० / सीआय- ३२४४) ही अर्धी अंगावर टाकून अज्ञात मारेकरी पसार झाले. घटनास्थळी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी भेट देत पंचनामा केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, गोपाळ भोसले, युवराज घोडके यानी घटनेची गंभीर दखल घेत तपास वेगाने सुरु केला आहे. आतापर्यंत दहा संशयितांना जत पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

Post a Comment

0 Comments