संखला अप्पर तहसिलदारांची तात्काळ नियुक्ती करा- तुकाराम बाबा महाराज

 श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेची मागणी


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील संख अप्पर तहसिलदार कार्यालयातील अप्पर तहसिलदार यांचे पद रिक्त असून याठिकाणी तात्काळ अप्पर तहसिलदार यांची नियुक्ती करावी अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिवती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, संजय धुमाळ आदी उपस्थित होते.
          जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे. जत पूर्व भागातील लोकांना शासकीय कामासाठी येणे खर्चिक व त्रासाचे होत असल्याने शासनाने संख येथे स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय सुरू केले. हे कार्यालय सुरू केल्याने जत पूर्व भागातील लोकांची दाखले व अन्य कामासाठी जतला न येता संखमध्येच कामे होत असल्याने सर्वसामान्यांची सोय झाली. संख अप्पर तहसिल कार्यालयाला स्वतंत्र अप्पर तहसिलदार हे पद मिळाल्याने कामाचा निपटारा करणेही सोपे झाले होते. मागील महिन्यात या ठिकाणी कार्यरत असलेले तत्कालीन अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे हे २३ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले तेव्हापासून हे पद रिक्त आहे.
         रिक्त असलेल्या या पदावर तात्काळ अप्पर तहसिलदार यांची नियुक्ती करावी असे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, संखचे अप्पर तहसिलदार हे पद रिक्त असल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रास होत आहे. १० वी आणि १२ वीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना अनेक दाखले हवे आहेत तसेच प्रशासकीय कामातही अडचण होत आहे. याबाबीचा विचार करून संखच्या रिक्त अप्पर तहसिलदारपदी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments