तहसीलदार सचिन पाटील यांची बदली झाल्यास आंदोलन करू; संजय कांबळे


जत/प्रतिनिधी: जतचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन पाटील यांच्या बदलीच्या हालचाली सुरू आहेत. कोरोनाच्या दोन्ही लाटेत तसेच प्रशासकीय कामकाजात तहसीलदार पाटील यांनी तालुक्यात प्रभावी काम केले आहे. त्यामुळे भविष्यातील तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार पाटील यांना मुदतवाढ द्यावी, अन्यथा रिपाइं आंदोलन करेल, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिला आहे.
       कांबळे म्हणाले, जत तालुक्याला प्रथमच असे अधिकारी मिळाले आहेत. गेल्या दोन वर्षात पाटील यांनी काम करताना सामाजिक हित जपले आहे. अगदी सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली आहे. प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. गेल्या दोन वर्षात त्याच्या प्रभावी कामामुळे तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. शिवाय ज्यावेळी कोरोना काय आहे, हे कुणालाच माहिती नव्हते. अशा पहिल्या लाटेत त्यांनी आपले कसब पणाला लावून सर्व विभाग, राजकीय नेते, नागरिकांना सोबत घेऊन कोरोनाला थोपविण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. त्याशिवाय दुसऱ्या लाटेतही त्यांनी आपले उत्तुंग कर्तव्य बजावत प्रभावी कामगिरी केली आहे.
        भविष्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तालुक्याची संपुर्ण माहिती असलेले तहसीलदार सचिन पाटील यांच्या अनुभवाची गरज भासणार आहे. नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांना मर्यादा पडू शकतात. त्यामुळे तहसीलदार पाटील यांना मुदतवाढ द्यावी, असेही कांबळे म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना याबाबत भेटणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments