जत मध्ये आर्थिक देवाण-घेवाणीतून युवकाचा खून । संशयित आरोपीस अटकजत/प्रतिनिधी: जत शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर कराडच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय  महामार्गावरील पशुपैदास केंद्राच्या हद्दीत (कॅटल फार्म) किरकोळ आर्थिक देवाण घेवाणीच्या - - कारणातून एकाला धारदार शस्त्राने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. बंदेनमाज उर्फ बंडा - मकबुल शेख (वय ४० रा. सातारा रोड, मदारी गल्ली) असे मृताचे नाव असून बुधवारी दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जत पोलिसांनी संतोष हारणे (वय ३५) या संशयित आरोपीला कवठेमहांकाळ येथून ताब्यात घेतले आहे.
        दरम्यान, रात्री उशिरा पर्यंत जत पोलिसांकडून खूनाच्या घटनेची चौकशी सुरू होती. त्यामुळे जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. शिवाय गेल्या आठ महिन्यात आठ खूनाच्या घटनेने तालुका हादरून गेला आहे. खूनाच्या सत्राने जत तालुका जिल्ह्यात हॉटस्पॉट बनला आहे.
        ही घटना समजताच जतचे उप विभागीय अधिकारी रत्नाकर नवले व जत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोपाळ भोसले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. यानंतर लगेचच आरोपीला पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, कवठेमहांकाळ येथून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात त्याला चौकशीसाठी आणण्यात आले होते. पोलिस व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, बंदेनमाज शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. गेल्या काही महिन्यापूर्वी जत शहरातील एकास चाळीस हजार रुपये किमतीचे जनावर विक्री केली होती. त्या जनावराला गंभीर आजार असल्याने ती परत शेख यांना दिली होती.
        दरम्यान, यामध्ये संबंधित व्यक्तीने व्यवहारातील पैसे परत करण्यासाठी शेख यांच्याकडे तगादा लावला होता. यातून दोघांमध्ये जोरदार वाद ही झाल्याची चर्चा होती. आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एका लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने हा आर्थिक देवाण घेवाणीचा विषय मिटविण्यात आला होता. मात्र, लगेचच सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बंदेनमाज शेख यांचा येथील कॅटल फार्म मध्ये धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. शेख यांच्या पश्चात पत्नी, चार मुली त्यापैकी तिघींचा विवाह झाला असून एक मुलगी व मुलगा आहे. घटनेनंतर काही तासांमध्ये कवठेमहांकाळ येथून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. या घटनेनंतर जत शहरात मोठी खळबळ उडाली.

Post a Comment

0 Comments