जत । घरफोड्या करणाऱ्या आरोपीस केले अटक । अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त । जत पोलिसांची कारवाईजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील कंटी व साळमाळगेवाडी येथील दोन घरफोड्यांतील आरोपी सावंता रावसाहेब दुधाळ (वय ३८ वर्षे, रा.साळमाळगेवाडी ता.जत) यास जत पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन बोरमाळी, दोन घंटण, फुले, झुबे, साखळ्या, रिंगा तसेच चांदीच्या धातूचे दागिने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहेत.
        दि. २५ मे रोजी भरदिवसा जत तालुक्यातील साळमाळगेवाडी येथील हौसाबाई नकुसा मासाळ यांच्या घराचे कुलूप तोडून एक लाख ५२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद हौसाबाई मासाळ यांनी जत पोलीस ठाण्यांमध्ये दिली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच दि. २९ जुलै रोजी पुन्हा भरदिवसा जत तालुक्यातील कंटी येथील अजित शामराव मदने यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ५७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने व १५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद अजित मदने यांनी जत पोलीस ठाण्यांमध्ये दिली होती.
काल ९ ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस नाईक आगतराव मासाळ, पोलीस हवालदार विशाल बिले यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन सावंता रावसाहेब दुधाळ यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली.दुधाळ याने साळमाळगेवाडी येथे चोरी केल्याचे कबूल केले. त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलिस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला.त्यावेळी साळमाळगेवाडी व कंटी येथील घरफोडी करून चोरी केल्याचे त्याने कबूल केले.चोरी केलेले दागिने काढून दिले. त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या तीन बोरमाळी, दोन घंटण, फुले, झुबे, साखळ्या, रिंगा असे ५४.५ ग्रँम वजनाचे तसेच चांदीच्या धातूचे २५० ग्रँम वजनाचे दागिने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक आगतराव मासाळ करीत आहेत.
         पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आगतराव मासाळ, पोलीस हवालदार विशाल बिले, पोलीस नाईक रामेश्वर पाटील, अमोल चव्हाण, गणेश ओलेकर, शिवानंद चौगुले, शरद शिंदे, मुजावर, राजू सावंत, महादेव पाटील, प्रशांत गुरव, अमोल पाटील यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments