लसीकरण कमी झालेल्या ठिकाणी अधिक जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 


सांगली : जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 चे लसीकरण सुरू असून आत्तापर्यंत 7 लाख 38 हजार 238 जणांना पहिला डोस तर 2 लाख 11 हजार 672 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे 32 टक्के नागरिकांचे कोविड-19 लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्यात लसीकरण कमी झाले असून ज्या ठिकाणी लसीकरण कमी झाले आहे, अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी, आशा वर्कर्स यांच्यामार्फत अधिक जनजागृती करावी. लसींचा पुरवठा जादा प्रमाणात करावा. मनुष्यबळाचा विचार करून आवश्यक तेथे लसीकरण केंद्रेही वाढवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. यावेळी त्यांनी खाजगी लसीकरण केंद्रांची काटेकोर तपासणी आवश्यक असून शासन निर्देशानुसार आवश्यक सुविधांची पुर्तता करणे बंधनकारक आहे. खाजगी लसीकरण केंद्रांना मंजुरी देत असताना सर्व नियमांची पुर्तता झालेली असणे अनिवार्य असल्याचे अधोरेखित केले.
 कोविड लसीकरण मोहिम, अतिसार नियंत्रण पंधरवडा, रोगप्रतिकारशक्ती वृध्दी कार्यक्रम आराखडा आदिंचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण समन्वयक डॉ. विवेक पाटील, महानगरपालिका लसीकरण समन्वयक डॉ. वैभव पाटील आदि उपस्थित होते.
      जिल्ह्यात ज्या हेल्थ केअर वर्करचा व फ्रंटलाईन वर्करचा दुसरा डोस प्रलंबित आहे अशांना प्राधान्याने लसीकरण करावे. जत मध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत लसीकरण काही प्रमाणात कमी झाल्याचे आढळून येत आहे. त्या ठिकाणी अधिक प्रमाणात जनजागृती करावी व लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. नगरपालिका, नगरपरिषदेच्या ठिकाणी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यात सद्या 377 लसीकरण केंद्रे असून यामध्ये 39 खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. शासन निर्देशानुसार सुविधांची पुर्तता करणाऱ्या  खाजगी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या बैठकीत दिले.
 15 ते 30 जुलै या दरम्यान अतिसार पंधरवडा असून या कालावधीमध्ये ओआरएस झिंक पाकिटांचे वाटप, बालकांचे स्तनपान व शिशुपोषण तसेच हात धुण्याचे प्रात्यक्षिक या विषयावर सुक्ष्म नियोजन करून अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच कुपोषीत बालकांवर उपचार, स्तनपानाचे महत्व व बालकांचे पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी अतिसार पंधरवड्यात लागणारी औषधे व त्यांचा पुरवठा याचाही आढावा घेण्यात आला. न्युमोनियावरील लसीकरण कार्यक्रमाचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments