सांगलीतील पुरग्रस्तांना मानव मित्र संघटनेकडून तातडीने मदत करणार- तुकाराम बाबा महाराज

अन्नधान्य, वैरण व पाण्याच्या बाटल्याचे करणार वाटप


जत/प्रतिनिधी:- कोरोना पाठोपाठ महापूराने सांगलीसह अनेक जिल्ह्यात थैमान घातले आहे. सांगली येथील पुरग्रस्तांच्या मदतीला मानवतेच्या धर्मातून श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना धावणार असून शक्य ती मदत सांगलीकरांना करण्यात येणार असल्याची माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

         गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चिखलगी भुयार येथे तुकाराम बाबा महाराज यांनी भाविकांना मास्कचे वाटप केले तसेच लसीकरणाबाबत जनजागृती केली.
       श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही कायम सर्वसामान्यांना व गोरगरिबांना मदतीसाठी सदैव सज्ज असते. मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून ही संघटना काम करत असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मागील दोन वर्षात जतसह सांगलीकरांनी कोरोना व महापुराच्या संकटाला न डगमगता तोंड दिले आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासनानेही सर्वतोपरी स्वतःला झोकून देत काम केले आहे. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने दोन वर्षात जमेल ती मदत करत सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले आहे. कोरोना काळात हजारो गरिबांना जीवनावश्यक किटचे वाटप केले. लॉक डाऊन काळात गावोगावी जाऊन निस्वार्थपणे घरोघरी भाजीपाला पोच केला. मास्क सॅनिटायझरचे वाटप करत लसीकरणासाठी जनजागृती केली. दुर्घटनेत ज्यांची घरे जळाली होती अशा कुटूंबियांना काही तासाच्या आत मानव मित्र संघटनेने मदत केली आहे.
          मागील वर्षी सांगलीत महापूर आला त्यावेळीही महापुरातील पूरग्रस्तांसाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना मदतीला धावून गेली होती. याही वर्षी सांगलीत महापूर आल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीत अडकलेल्यांना मदत करण्यासाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेने नियोजन आखले असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले की, जतचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याशी संपर्क साधला असून नेमकी कोठे मदतीची गरज आहे. त्याची माहिती घेतली जात आहे. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी अन्नधान्य, वैरण, पाण्याच्या बाटल्या पोच करण्यात येणार आहेत.

सांगलीही आपलीच आहे चला मदत करू या- तुकाराम बाबा महाराज-
        जतसारख्या दुष्काळी भागाला मदत करताना नदीकाठच्या लोकांनी मदतीचा हात आखडता घेतला असा सूर जतकरांतून ऐकण्यास येतो. त्यात कितपत सत्य आहे या चर्चेचा विषय आहे. महापुरासारख्या कठीण परिस्थितीत आपल्याच भागातील, आपलेच लोक संकटात सापडले आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. मानवतेच्या धर्मातून त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. सांगलीही आपलीच आहे चला मदत करू या. मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments