सांगली, मिरज, कुपवाड भागातील पूरग्रस्तांना तुकाराम बाबांनी दिला मदतीचा हात

◆ धान्य, पाण्याच्या बाटल्या, अन्नदान व जनावरांना चारा व गोळी पेंडेचे वाटप
◆ श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना धावली मदतीला


जत/प्रतिनिधी: सांगली भागात महापूर आला व होत्याचे नव्हते झाले. घरात पाणी शिरल्याने खायचे वांदे झाले, प्यायला पाणी ही मिळत नाही. जनावरांचे तर हाल बहाल. या कठीण परिस्थितीत चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा  महाराज व त्यांची टीम पुरग्रस्तांच्या मदतीला धावून गेली.
       मागील वर्षीही सांगलीला महापूर आला त्याहीवेळी तुकाराम बाबा महाराज यांनी सांगलीकरांना मदत केली होती. याही वर्षी प्रशासनाने आवाहन करताच तुकाराम बाबा महाराज सांगलीकरांच्या मदतीला धावले. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने महापुरात अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटूंबियांना मदतीचा आधार देण्यासाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तुकाराम बाबा महाराज यांनी पुढाकार घेतला. सांगली, मिरज, कुपवाडसह रामनगर, शामराव नगर काळेवाडी, आकाशवाणी केंद्र, काका नगर, होड्डी, ढवळे आणि म्हैशाळ रोड चा काही भाग, धामणी हायस्कुल चांदणी चौक, कुपवाड जि. प शाळा क्रमांक एकमध्ये स्थलांतरीत झालेल्या पूरग्रस्त भागात तुकाराम बाबा महाराज व त्यांच्या टीमने भेट दिली.
        श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने महापुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना धान्य, पाण्याच्या बाटल्या, निवाऱ्यात थांबलेल्या सांगलीकरांना अन्नदान करण्याबरोबर मुक्या जनावरासाठी गोळी पेंडचे वाटप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
         यावेळी संजय धुमाळ, जेटलींग कोरे ,प्रशांत कांबळे,सुरज मणेर, बसवराज व्हनखंडे, सुनील गंगणे, रवींद्र गेजगे, सिद्राया मोरे, आदित्य धुमाळ, ऋषी दोरकर, विशाल राठोळ, सोहन धुमाळ, जयदीप माने, उस्मान मुल्ला, जयदीप माने, साहिल सय्यद, अभिजीत माने, सतीश माने, श्रवण माने, निखिल कांबळे, सुजल भोसले आदी उपस्थित होते.

पुरग्रस्तांना अश्रू झाले अनावर-
        तुकाराम बाबा महाराज हे ज्यावेळी मदत घेवून पुरग्रस्तांच्या घरापर्यत गेले त्यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरले नाहीत. निसर्गाने आमचे व्हत्याचे नव्हते केले, बाबा आता तुम्ही सांगा जगायचं कस या त्यांच्या प्रश्नांने उपस्थितांचे डोळे पाणावले. पुरग्रस्तांना अश्रू अनावर झाले. तुकाराम बाबा यांनी पुरग्रस्तांना आधार देत आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments