मिरज व उदगाव मधील आर्केस्ट्रा कलाकारांना तुकारामबाबांनी दिला मदतीला हात

आर्केस्ट्रा कलाकारांच्या घरी जाऊन केले जीवनावश्यक किटचे वाटप


जत/प्रतिनिधी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉक डाऊन जाहीर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली. कोरोनाचा कहर व शासनाने घातलेल्या बंदीमुळे कलाकारावरही संक्रांत आली. संपूर्ण राज्याला आपल्या कलेने घायाळ करणारे कलाकार भुकेने व्याकुळ झाले, जगाला पोट धरून हसविणारे कलाकारांवर पोटाला चिमटा घेण्याची वाईट वेळ आली. राज्यभर कलाकार म्हणून वावरणाऱ्या या कलाकारांनाच्या मदतीला कोणीच आले नाही. याला अपवाद ठरले ते चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज.
          तुकाराम बाबा महाराज यांचे व मिरज व कोल्हापूर जिल्हयात उदगाव येथील लोककलाकारांचे जुने ऋणानुबंध आहेत. तुकाराम बाबा महाराज यांनी या भागातील कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव व अन्य कार्यक्रमाच्या वेळी तुकाराम बाबा महाराज यांनी या कलाकारांना मदतीचा हात दिला आहे. बाबांनी अनेक कार्यक्रम त्यांना ठरवूनही दिले आहेत. या भागात तुकाराम बाबांना मानणारा मोठा कलाकार वर्ग आहे.
          कोरोनामुळे गावोगावी होणारी यात्रा, जत्रा, सण, उत्सव बंद झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका गावोगावी जावून लोकांचे मनोरंजन करणारे, समाजजागृती करणाऱ्या कलाकारांना बसला आहे. या कलेशिवाय त्यांच्याकडे दुसरे जगण्याचे साधन नसल्याने त्यांच्यावर, त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली. कलाकारांच्या गल्लीत कार्यक्रम ठरविण्यासाठी जी लगबग असायची ती बंद झाली. कार्यक्रमच बंद झाल्याने कलाकारांच्या गल्लीत शुकशुकाट पहावयास मिळाला. 
         नेहमी गजबलेल्या या गल्लीत मागील दीड वर्षात एकाही दानशूर व्यक्ती, संस्थेने मदतीचा हात दिला नाही. कलाकारांच्या या गल्लीतील व्यथा या भागातील कलाकारांनी पत्राद्वारे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांना कळविले. मदतीचा हात द्या अशी मागणी या कलाकारांनी बाबांकडे केली . कलाकारांच्या या मदतीला बाबा धावून आले. मिरज व उदगाव येथे स्वतः जावून त्यांनी कलाकारांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी मिरज व उदगाव येथील कलाकार आप्पासो नदाफ, प्रशांत माने, सुहास चिंडे, हयातचांद नदाफ, ज्योती कोरे, निलेश कांबळे, सुप्रिया दबडे, रजाक नदाफ, तनुजा नदाफ, आयुब जमादार, कल्पना माने, तुकाराम कोळी, साजादबी बारगीर, सुरेखा पवार,रामा कोळी, वर्षाराणी धुमाळ, हिम्मत कांबळे, शानुर जमादार, गणेश कांबळे, समीर सययद यांची तुकाराम बाबांनी भेट घेत त्यांना जीवनावश्यक किटचे वाटप केले.

कलाकारांना द्या मदतीचा हात- तुकाराम बाबा
महाराष्ट्राने कायम कलाकारांचा आदर, सन्मान केला आहे. महाराष्ट्रातील कलाकारांनीही रसिक व कलेच्या जोरावर राज्याचे नाव जगात गाजविले आहे. कोरोनाच्या या कठीण काळामुळे आज लोकरंजन, लोकजागृती करणाऱ्या कलाकारावर वाईट वेळ आहे. अशा वेळी कलाकारांना शासनाने राजाश्रय द्यावा तसेच समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनीही मदतीचा हात द्यावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments