जत/प्रतिनिधी: जतचे तहसीलदार सचिन पाटील यांचा तीन वर्ष्याचा कार्यकाल पूर्ण झाल्याने, बदलीच्या हालचाली सुरू आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे. अशा स्थितीत सचिन पाटील यांच्यासारखे अनुभवी अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे तहसीलदार पाटील यांना सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अँड.जाधव यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, तालुक्यात दोन्ही लाटेत कोरोनाचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. तब्बल 286 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा उद्रेक वाढलेला असताना तहसीलदार सचिन पाटील यांनी आपला अनुभव पणाला लावून अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रभावी काम केले आहे. सलग दोन्ही लाटेत तहसीलदार पाटील यांनी काम केल्याने त्यांना तालुक्याच्या परिस्थितीचा चांगला अनुभव आला आहे.
सध्या असलेला कोरोनाचा प्रभाव, तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे त्यांच्या अनुभवाची गरज तालुक्यातील प्रशासनाला गरजेची आहे. त्यांची बदली झाल्यास नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना तिसरी लाट उद्भवल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे प्रशासनाची चांगली जाण असलेले तहसीलदार सचिन पाटील यांना सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी असेही अँड.जाधव यांनी म्हटले आहे.
0 Comments