जिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

-आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार

-नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे


सांगली : जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले असून या पैकी एक पथक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. ते आष्टा व शिरगाव या ठिकाणी कार्यरत आहे. आज रात्री दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार आहे. अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांनी बोटींमार्फत रेस्क्यु करण्याची वेळ येवू देऊ नये, वेळ आहे तोपर्यंत त्वरीत सुरक्षितस्थळी स्थलांतरण करावे. 
        जिल्ह्यात आतापर्यंत 100 कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले असून त्यांनी व्यवस्था दोन निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. जसजसे स्थांलातरीत कुटुंबांची संख्या वाढेल  त्या प्रमाणात निवारा केंद्रांची संख्या वाढविण्यात येतील असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 
        सध्या आयर्विंन पुल येथे पाणी पातळी 41 फुटांहून अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळ पर्यंत आणखी 10 ते 12 फुट वाढण्याची शक्यता आहे. सांगली आयर्विंन पुलाखाली पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाईल हे लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून स्थलांतरणासाठी त्वरित प्रतिसाद द्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे. वेळीच स्थलांतरीत केल्यास पुढील धोके टाळता येतील. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 
         व्यापऱ्यांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आयर्विन पुलाखाली पाणी पातळी 50 फुटांपर्यंत वाढल्यास बाजारपेठेत, व्यापारीपेठेत पाणी येवू शकते त्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या साहित्याची हलवाहलव करावयाची असल्यास त्यांनाही मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रशासनाची यंत्रणा कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments