महावितरणने सक्तीची वसुली त्वरित थांबवावी अन्यथा कार्यल्याबाहेरच रक्तदान शिबिर; तुकाराम बाबा महाराज; मानव मित्र संघटनेचा इशारा


जत/प्रतिनिधी: एकाबाजूला कोरोनाने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना दुसऱ्या बाजूला महावितरणने वीज बिलाची सक्तीची वसुली चालू केली आहे. वसुलीसाठी ज्यांचा काही संबंध नाही अशा खाजगी लोकांची नियुक्ती करून दमदाटीने वसुली केली जात आहे. कोणतीही सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जात आहेत. सध्याचा कठीण काळ बघता महावितरणकडून जो स्थिर आकार लावला जातो तो लावू नये. या मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयासमोरच निषेध नोंदवीत रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचा इशारा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे.

          तुकाराम बाबा महाराज यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे,रुपेश पिसाळ,विवेक टेंगले,बाळासाहेब मोटे आदी उपस्थित होते.

          निवेदनात नमूद केले आहे की, जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत असला तरी शेतीमालाला दर नाही. सध्या सर्वच प्रकारच्या घटकांना कोरोना महामारीच्या संकटाशी झुंज द्यावी लागत आहे. सामान्य जनता, अल्पभूधारक शेतकरी, लहान-मोठे  उद्योजक, व्यापारी यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. शेतीमालाला दर नाही, शेतकरी अडचणीत आहेत. अशा कठीण परिस्थितीत देखील केंद्र सरकार तथा राज्य सरकारला त्यांची दया देखील येत नाही. तर  कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असतानाच विद्युत मंडळाने सक्तीची वीज बिल वसुली सुरु केली आहे.

शहरी व ग्रामीण भागात वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही महावितरणने सुरू केली आहे. खरे तर विद्युत कायदा २००३ सेक्शन क्र. ५३ अन्वये कनेक्शन तोडण्यापूर्वी ग्राहकांना १५ दिवसांची पूर्वसूचना नोटीस देणे जरुरी आहे. मात्र वीज मंडळाने मोबाईल वर मेसेज देऊन तो मेसेजच नोटीस समजण्यात यावा असे तुघलकी फर्मान काढले आहे. एक तर हा मेसेज इंग्रजी भाषेत आहे. तो सामान्य नागरिकांना कळत नाही. तसेच कित्येक नागरिकांकडे मोबाइलच नाहीत, असल्यास त्यांना त्याचा वापर करता येत नाही.

        तसेच ग्रामीण भागात वीज बिल वसुलीसाठी खाजगी पथक पाचारण केल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. हे लोक (ज्यांचा विद्युत मंडळाशी काही एक संबंध नसताना) वीज बिल वसुली साठी जबरदस्ती करत आहेत. आम्ही आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की, आपण ग्राहकांना बीज बिल भरणे सक्ती करू नये. तसेच पूर्व सूचना दिल्याशिवाय त्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. तसेच विद्युत मोटारीचे किमान वीज बिल भरून  त्याचे टप्पे करण्यात यावेत. कोरोणाच्या महामारीत सर्व व्यवसाय बंद असल्याने लावण्यात येत असलेला स्थिर आकार रद्द करावा व राहिलेले बिल टप्पे करून द्यावे. असे न झाल्यास रक्तदान करून आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments