जत शहरात मोकाट गाईच्या हल्ल्यात गुगवाडचा वृद्ध गंभीर जखमी; नगरसेवक एडके धावले मदतीलाजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील गुगवाड येथील - वृद्ध संगाप्पा पुजारी यांना मोकाट गाईने शिंग मारत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  प्रसंगाचे गांभीर्य समजल्यावर नगरसेवक टीमुभाई एडके व समीरभाई उमराणी हे तातडीने मदतीला धावले. दरम्यान या गाईने बाजार समितीच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
       याबाबत अधिक माहिती अशी की, जत शहरात मोकाट जनावरे व कुत्रांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापूर्वीही भटक्या जनावरांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. गुगवाड येथील संगाप्पा पुजारी हे बसस्थानक परिसरात थांबले होते. यावेळी अचानक आलेल्या गाईने पुजारी यांच्या शरीराच्या मानेच्या जवळ शिंग खुपसून गंभीर जखमी केले. दरम्यान ही घटना नगरसेवक टीमु भाई एडके यांना समजली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्यांचे मित्र समीरभाई उमराणी यांना तातडीने बोलावून घेतले. नगरसेवक टीमू एडके व समीर उमराणी यांनी दुचाकीवर त्या जखमी वृद्ध इसमास आपल्या दुचाकीवर बसविले. त्यानंतर जत येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. तर दुसरीकडे त्या गाईने बाजार समितीच्या परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. आणखी कोणाला गाईपासून इजा होऊ नये म्हणून गाईला पकडण्यासाठी डॉ. प्रवीण वाघमोडे, मेहबूब जातकार, गोविंद पवार, सुमित कोडग, आदर्श जाधव आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments