"चिंच विसावा"-धकाधकीच्या तणावपूर्ण आयुष्यात विकेंड विसाव्याचे कृषी पर्यटन केंद्र- तहसीलदार सचिन पाटील


जत/प्रतिनिधी: १ जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून शेगाव ता. जत जि. सांगली येथे चिंच विसावा कृषी पर्यटन केंद्राचा उद्घाटन सोहळा तहसीलदार सचिन पाटील यांचे हस्ते पार पडला. कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध असल्याने हा उद्घाटन सोहळा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत डिजिटल पद्धतीने पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण यूट्यूब चैनलवरून करण्यात आले होते.

       शेगावचे प्रगतशील शेतकरी प्रल्हाद बोराडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उज्वला बोराडे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रकल्प येथे साकारन्यात आला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील पिढीला आपल्या वाडवडिलांच्या समृध्द ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देता येईल, या पद्धतीने या केंद्राची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक रोजगार निर्मिती, स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मार्केट व योग्य दर उपलब्ध होण्यासाठी या कृषी पर्यटन क्षेत्राचा उपयोग होईल.

       कृषी उपविभागीय अधिकारी मनोज वेताळ यांनी, तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीही यातून स्फूर्ती घेऊन कृषी पर्यटन व्यवसायाकडे डोळसपणे पाहून या क्षेत्रात पाऊल ठेवावे असे आवाहन केले आहे. या कृषी पर्यटन केंद्राच्या निमित्ताने, जत सारख्या दुष्काळी भागामध्ये तरुण शेतकरी वर्गास नवी दिशा, नवी शेतीची पद्धत प्रल्हाद बोराडे यांनी दाखवली आहे, असे गौरवोद्गार तहसीलदार सचिन पाटील यांनी यावेळी काढले.

       यावेळी जत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भोसले, उपसरपंच सचिन बोराडे, डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉ. संभाजी देशमुख, डॉ. शिवाजी खिलारे, कोळसे सर, SVRD हायस्कूलचे मुख्याध्यापक नदाफ सर, मॉडर्न हायस्कूल चे मुख्याध्यापक बोराडे सर, नवनाथ केदार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः प्रल्हाद बोराडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments