फसवणूक व जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखलजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील वज्रवाड येथील बाबू बसगोंडा खलाटी यांच्या विरोधात फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदाशिव भिमांना मांग (वय 45) यांनी जत पोलिसात अट्रासिटी अंतर्गत फिर्याद दाखल केली आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी, वज्रवाड येथील सदाशिव मांग यांना तीस हजार रुपयेच्या गरजेपोटी गावातील बाबू खलाटी यांच्याकडून तीस हजार रुपये घेतले होते. पैशाच्या मोबदल्यात दोन वर्षासाठी खरेदी दस्त करू असे सांगितले होते. परंतु सदाशिव यांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत बाबू खलाटी यांनी कायमस्वरूपी खरेदी दस्त करून सदाशिव मांग यांची फसवणूक केली होती. दोन वर्षानंतर सदरची फसवणूक लक्षात आल्याने सदाशिव मांग यांनी गावातील पंच लोकांना बोलावून याबाबतची माहिती दिली होती. यावेळी पंचासमक्ष घेतलेले पैसे मी व्याजासहित परत देण्यास तयार आहे. असे मांग यांनी सांगितल्याने विहिरीची दोन दिवसाची पाण्याची पाळी व एक लाख तीस हजार रुपये दिल्यास परत देतो, असे खलाटी यांनी कबूल केले होते. त्यानुसार पाळी फिरवून देण्याचे ठरले होते. याकरिता जत निबंधक कार्यालयात दस्त करण्याचे ठरले होते. त्यानुसार सदाशिव मांग निबंधक कार्यालयात गेले होते. परंतु त्या ठिकाणी खलाटी आले नाहीत. यावेळी खलाटी यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. दरम्यान सदाशिव मांग व त्यांची पत्नी सुरेखा हे विहिरीवर पाणी भरण्यास गेले असता, त्यांना तुम्ही यापुढे या विहिरीवर यायचं नाही. असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. यानुसार जत पोलिसात खलाटी यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.

Post a Comment

0 Comments