क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात

महाराष्ट्रात वर्षभर विविध उपक्रम -कॉम्रेड धनाजी गुरव


जत/प्रतिनिधी: भारतच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून लढा दिला. परंतु त्यातील मोजक्याच क्रांतिवीरांची दखल इतिहासाने घेतली. तर अनेकांचा साधा नामोल्लेखही कुठे दिसून येत नाही. अशापैकीच एक क्रांतीवीर म्हणजे सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील सिंदूर येथील वीर सिंदूर लक्ष्मण होय. या महान क्रांतीकारकाच्या हौतात्म्यास 15 जुलै 2022 ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या स्मृती शताब्दी वर्षाला 15 जुलै 2021 पासून प्रारंभ होत आहे. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात वीर सिंदूर लक्ष्मण यांचे स्मृती शताब्दी वर्ष विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरे करणार असल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी सिंदुर ता.जत येथे केली. 

       वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दीच्या पूर्वतयारी संदर्भातील व्यापक बैठक सिंदूर येथे ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने झाली. त्यावेळी गुरव बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंदूर चे सरपंच गंगाप्पा हारुगेरी होते. धनाजी गुरव म्हणाले, महाराष्ट्र ही क्रांतीकारकांच्या संघर्षमय लढ्याची भूमी असून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडणार्‍या प्रतिसरकारच्या क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. लाड, नागनाथअण्णा नायकवडी पासून या जिल्ह्याच्या गाव खेड्यापर्यंत इंग्रजांच्या विरुद्ध लढणारी कितीतरी क्रांतिकारक होते. त्यांनीं आपल्या देशासाठी योगदान दिलेले आहे. यापैकीच सिंदूरचे 'वीर सिंदूर लक्ष्मण' हे एक अत्यंत लढाऊ असे क्रांतिवीर होते. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राने आजवर घेतली नाही. त्यांचा क्रांतीकारी इतिहास सांगितला गेला नाही. ही चिंतेची बाब आहे. यावेळी इतिहास अभ्यासक प्रा.गौतम काटकर यांनी वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या क्रांतिकार्यातील लढ्याची माहिती या बैठकीत दिली. तसेच 15 जुलै 2021 रोजी त्यांचे जन्मगाव असलेल्या याच सिंदूर येथूनच 'वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या जन्मभुमीला अभिवादन करून स्मृती शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. बैठकीत स्मृती शताब्दी वर्षांचे कार्यक्रम व आराखडा याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत कॉम्रेड मारुती शिरतोडे, प्रा. दादासाहेब ढेरे, सुरेंद्र सरनाईक, दगडू जाधव, हिम्मतराव मलमे, बाबुराव जाधव, कवी नितीन चंदनशिवे, आदित्य माळी, भगवान सोनंद सर, विशाल शिरतोडे, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर, विक्रम शिरतोडे, पाटील सर, मगदूम सर व सिंदूरच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला. 

        बैठकीनंतर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या घराला विद्रोही सांस्कृतिक चळवळ व आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट देऊन वारसांशी चर्चा केली. या बैठकीचे संपूर्ण संयोजन क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मारक समितीचे अध्यक्ष बी. आर. पाटील सर व सूत्रसंचालन प्रा. हणमंत मगदूम सर यांनी केले. यावेळी महादेव बालीकाई, सुरेश मुडशी, आप्पासो जनगोंड, सुरेश काडगोंड, दयानंद बाबानगर आव्वाना कांबळे, शिवानंद हारुगेरी,भिमन्ना सुतार, अकबर मुल्ला आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments