जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय जोमात । सामाजिक स्वास्थ्य धोक्यात । पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष


जत/प्रतिनिधी:

        जत पुर्व भागातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याने थैमान घातले असून याकडे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. यासाठी संबधीत पोलिस अधिकारी यांची बदली करून उमदी पोलिस ठाण्यात खमक्या पोलिस अधिकारी द्यावा अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.

          जत पुर्व भागातील ५० हुन अधिक गावाचा कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी उमदी पोलिस ठाणे आहे. याठिकाणी १ सहाय्यक पोलिस निरिक्षण तर सध्याच्या घडीला ४ पोलिस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. तसेच ३० हुन अधिक पोलिस कर्मचारी आहेत. मात्र काही नाममात्र पोलिस कर्मचारी याठिकाणी हप्तेगीरी करत फिरताना दिसुन येतात. तर पोलिस अधिकारी यांचा कुठेच वचक असल्याचे दिसून येत नाही. सरळ-सरळ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे अवैध धंदेवाल्यासोबतच उठणे बसणे असल्याचे उघड-उघड चित्र उमदी पोलिस ठाण्यात दिसुन येते. काही दिवसांपूर्वी भर दिवसा उमदी पोलिस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वस्तीवरुन एका नवविवाहित मुलीस तालुक्यातीलच गावगुंडानी नंग्या तलवारीचा धाक दाखवत पळवुन नेले, मात्र अद्याप त्या नवविवाहित महिला व तिला पळून नेणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात उमदी पोलिस अपयशी ठरलेत. तर उमदी येथे एका राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त भरचौकात दोन गटात राडा होत असताना देखील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता पोलिस अधिकारी यांनी फक्त बघ्याची भुमिका घेतल्याचे दिसून आले. चार दिवसापूर्वी तिंकोडी ता.जत येथे एका पोलिस कर्मचारी यांस मारहाण झाली यामुळे उमदी पोलीसांचा वचक राहिले नसल्याचे दिसून येते तर उमदी पोलीसांच्या विरोधात तक्रार करणार्या उपसरपंच यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे उपसरपंच यांनी सांगितले. यामुळे उमदी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा नाकर्तेपणा दिसून येत आहे.

        उमदी सह गल्ली बोळात पत्यापासुन ते मटक्यापर्यत , वाळुपासुन ते दारू पर्यंत अनेक अवैध धंद्यानी वर तोंड काढत सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देण्याचा उद्योग चालवला आहे. यामुळे उमदी पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदे बंद करा व हप्तेखोर पोलीसांची चौकशी करून कारवाई करत उमदी पोलिस ठाण्यात खमक्या अधिकारी द्यावा अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments