जत शहरातील मदारी वस्तीत घाणीचे साम्राज्य; नगरपरिषदेने सुविधा न दिल्यास आंदोलन; युवक नेते मेहबूब शेख


जत/प्रतिनिधी: जत शहरातील डॉ.आंबेडकर स्टेडियम जवळील मदारी वस्ती परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, या भागात नगरपरिषदेने सोई सुविधा देणे आवश्यक आहे. या सुविधा न पुरवल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते मेहबूब शेख यांनी दिला आहे.

         मेहबूब शेख म्हणाले की, नगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रभाग क्रमांक दोन हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या भागात कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. या नागरिकांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले आहे. पण त्या ठिकाणी गटारी नाही, रस्ते नाहीत. गटारीचे पाणी हे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे डेंगू, मलेरिया यासारखे रोग पसरण्याची भीती आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यापूर्वी या भागातील नागरिकांचा डेंगू व मलेरियाने मृत्यू झाला होता. एवढी गंभीर परिस्थिती असताना या भागातील नगरसेवकांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवा नेते मेहबून शेख यांनी केला. 

        विशेष म्हणजे काँग्रेसचे गटनेते साहेबराव कोळी व काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे यांच्या पत्नी या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र त्यांना या भागात सोयीसुविधा द्या, असे वेळोवेळी सांगुन सुध्दा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेख यांनी केला. या भागातील नागरिकांना सोयी सुविधा न दिल्यास आंदोलनाचा इशारा युवा नेते मेहबूब शेख यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments